‘कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार…’; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

पुणे : सध्या देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. तसंच हनुमान चालिसावरुन राजकारण तापलं असताना भाजपाच्या काही नेत्यांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागण्याची मागणी होत असल्यासंबंधी विचारण्यात आलं शरद पवार म्हणाले की, “सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझं सरकार बर्खास्त केलं. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान आवरलं. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला”.
सत्ता येते आणि जाते पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही याची अस्वस्थता असते. पण या सगळ्या आमच्या सिंहांना सुद्धा या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात,” असंही शरद पवार म्हणाले.