ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

फडणवीसांनंतर पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

मुंबई : (Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar) मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर मोठा गौप्यस्फोट केला. पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता. या संदर्भात थेट शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यानंतर आता आणखीन राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचं पत्र दाखवलं. मग शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात आव्हान दिल्यावर त्यांनी माघार घेत राजीनामा दिला.”

कोश्यारी पुढे म्हणाले, “राज्यपाल कधीही स्वतःहून शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात, तेच बोलवतात. मी ज्यांना शपथ दिली, त्यांनी याबद्दलचं सत्य सांगितलं आहे. त्यावेळी तुमच्यावर कोणाचा दबाव होता का, असं विचारलं असता कोश्यारी म्हणाले, माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांनी मला वेळ मागितला, मग मी त्यांना वेळ दिला. काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. ते म्हणाले की वेळ दिली तर आमदारांचा घोडेबाजार होईल. मग मी बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी कमी केला. यात माझी भूमिका संदिग्ध कशी काय? सकाळी ८ वाजता शपथविधी झाला तरी लोक त्याला पहाटेचा शपथविधी म्हणतात. याला काय अर्थ आहे?”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये