ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्पावरून अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, “लागेल ते करा पण…”

मुंबई | Vedanta Foxconn – वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसंच राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेला. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी पत्रात केला आला आहे.

अजित पवार पत्रात काय म्हणाले?

वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रिकेशनचा तळेगाव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेल्याचं कळतं. वेदांता व तैवान येथील फाॅक्सकाॅन या कंपनीचे 60:40 असे जाॅईंट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे 2 लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे 1.5 लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली.

जागा निवडीसाठी एकूण 100 मुद्द्यांचा विचार करून त्यांनी तळेगाव टप्पा 4 ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगाव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टिव्हिटी, JNPTशी असणारी कनेक्टिव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगाव येथील 1000 एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचं सुचविलं आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र वरिष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगावच्या तुलनेत काहीच नाही.

गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (MOU) करणार आहेत, असे कळते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे. पंरतु ही गुंतवणूक जाऊ देऊ नये. यामुळे महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. कारण यामधून मोठ्या प्रमाणावर GST मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावे, ही विनंती. (अजित पवार)

letter

दरम्यान, महाराष्ट्रात जवळपास निश्चित झालेला वेदांता-फाॅक्सकाॅनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तब्बल एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखभर नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणारा सेमिकंडक्टर्सचा हा प्रकल्प अखेरच्या क्षणी गुजरातला मिळाला. त्यावरुन काल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये