ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

महाराष्ट्र भाजपात धूसफूस? राष्ट्रवादीच्या एका गटाची संगत पक्षात रुचली नाही?

पुणे | Maharashtra Politics – महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या भाजपात (BJP) घडणाऱ्या घटना कार्यकर्त्याना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) भ्रष्ट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केल्यानंतर ४ दिवसातच राष्ट्रवादीमधील अस्वस्थ पण महत्त्वाकांक्षी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाचे स्थान देण्यात आले. मोदी, अमित शहांनी अजित पवार यांची प्रशंसा केली. भाजपची ताकद वाढली, असा बोलबाला झाला. पण पवार यांची संगत पक्षात रुचली नाही. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार समन्वयाने चालले असताना पवार यांची गरज काय, अनेक गावांत राष्ट्रवादीशी संघर्ष करत वाटचाल करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना तर पक्षश्रेष्ठांचा निर्णय अजिबात पटला नाही.

पक्षातील भावना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखविली. त्यानंतर मुनगुंटीवार यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून डावलले जाऊ लागले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत शुक्रवारी झाली. त्या बैठकीचे निमंत्रण मुनगुंटीवार यांना नव्हते. त्यामुळे पक्षातील दुहीची चर्चा प्रसारमाध्यमात चालू झाली. पवारांची संगत पटली नाही, अशा आशयाचे विधान मुनगंटीवार यांना भोवले काय, असे तर्क लावले जात आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत चालला आहे. त्याकडे भाजपतील इच्छुक आमदारांचे लक्ष आहे. भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने अजित पवारांचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बदलले. भाजपमध्ये काय घडतेय याची चर्चा होऊ लागली.

महाराष्ट्रात भाजपची मदार सर्वस्वी फडणवीस यांच्यावरच आहे. बावनकुळेंची त्यांना साथ आहे. ‘एक अकेला फडणवीस क्या करेगा?’ अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांना हिणवले होते. पण, फडणवीसांनी स्वतःच ते काय करू शकतात ते दाखवून दिले. अजूनही अकेला फडणवीसांनाच सर्व सांभाळावे लागत आहे. पक्ष संघटनेला ताकद देणे, दिल्लीतील नेत्यांशी संपर्क ठेवणे, मंत्रिमंडळातील सर्व घटक तसेच प्रशासनांना सांभाळून घेणे आणि त्याच वेळी विरोधकांच्या जातीय प्रचाराला त्यांनाच सामोरे जावे लागत आहे. फडणवीसांना विविध मार्गांनी कोंडीत पकडण्यासाठी चाली रचल्या जात आहेत आणि अशाच वेळी भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस चालू झाली तर, ते वातावरण पक्षासाठी चांगले राहणार नाही.

एका राजकीय अभ्यासकाच्या मते फडणवीस जसे सगळ्यांना सांभाळून घेत आहेत, तसेच किमान लोकसभा निवडणूक होईपर्यंत सर्वांनी फडणवीसांना सांभाळून घेतले पाहिजे. जालना येथील लाठीहल्ल्याच्या आदेशाशी फडणवीस यांचा काहीही संबंध नव्हता मात्र, उगीचच त्यांचे नाव त्यात गोवण्यात आले आणि त्यांच्या विरोधी काहूर उठविण्यात आले. या लाठीहल्ल्यात आंदोलक जसे जखमी झाले तसेच अनेक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले. गृहमंत्री म्हणून दोन्ही बाजू त्यांच्यासमोर होत्या. परंतु राज्यात शांतता राहावी यासाठी फडणवीसांनी जाहीर क्षमाही मागितली. क्षमा मागितली म्हणजे कबुलीच दिली असा अर्थ एका नेत्याने काढला तरीही फडणवीस शांतच राहिले. जनतेनेही या विधानाबाबत त्या ज्येष्ठ नेत्याला प्रतिसाद दिला नाही.
महाराष्ट्राच्या भाजपमधील नेते असलेल्या फडणवीस यांना जातीच्या आधारे कोंडीत पकडण्याचा डाव काही व्यक्तींकडून खेळला जात आहे. पक्षाबरोबर आलेला पवार फॅक्टर आणि त्याचे परिणाम, तसेच पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा, अशा घडामोडी घडताना दिसत आहेत.

पंकजा मुंडेंबाबत अनेक प्रश्न अनु्त्तरीत

पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी स्वतंत्रपणे शिवशक्ती परिक्रमा चालू केली. पण, पक्षाच्या सर्वच नेत्यांनी परिक्रमेकडे पाठ फिरविली. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव स्वतंत्र परिक्रमा काढतात? शिस्तबद्ध पक्ष यात कोणतीच भूमिका घेत नाही? अनुल्लेखाने योग्य तो इशारा मुंडे यांना द्यायचा असा पक्षाचा विचार आहे का, परिक्रमेनंतर मुंडे कोणता पक्ष वा कोणती राजकीय भूमिका घेणार, असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये