रावण-राजा राक्षसांचा

पुस्तक परीक्षण | अश्विनी धायगुडे-कोळेकर |
लहानपणापासून आपण सगळेच जण राम रावणाच्या गोष्टी ऐकत मोठे झालो. राम म्हणजे प्रत्येक आदर्श तर रावण म्हणजे नकारात्मकता. राम म्हणजे चांगुलपणा तर रावण म्हणजे दुष्टपणा. राम नक्कीच महान होते पण म्हणून रावण अगदीच टाकाऊ होता? हा प्रश्न कदाचित कोणाला पडला नसेल. कारण रामच्या चांगुलपणापुढे इतरांचे चांगुलपण नक्कीच झाकोळले गेले हे वास्तव त्यांनी स्वीकारले असेल. पण एका लेखकाने थोडा तिरका विचार केला.
राम अर्थात ग्रेटच होते मग ते एखाद्या येरागबाळ्याशी वैर घेऊन कसे लढतील. नक्क्कीच राम ज्याच्याशी लढले ती व्यक्ती देखील त्याच तोडीस तोड असणार. आणि तिथून सुरू झाला खऱ्या अर्थाने ‘रावण – राजा राक्षसांचा’ या पुस्तकाचा प्रवास. शरद तांदळे लिखित रावण राजा राक्षसांचा हे गेले तीन वर्षे बेस्ट सेलर पुस्तक म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या मनात या रावणाने घर केले. कारण हा रावण आम्हाला दाखवलेल्या, सांगितलेल्या आणि दरवर्षी आम्ही दसऱ्याला ज्याचे दहन करतो त्या रावणापेक्षा फारच वेगळा होता.
या रावणाला सद्सद्विवेक बुद्धी होती. साक्षात नारदमुनीने देखील त्याचे कौतुक केले होते. प्रचंड बुद्धिमान असल्यासोबतच तितकाच शांत, मितभाषी आणि विचारी होता हा रावण. ब्रह्मदेवाकडून शिक्षण घेतलेल्या रावणाने पाहिलं होतं त्याच्या आई आणि मावश्याना अन्याय सहन करताना, पशूंसमान वागणूक मिळताना अन जिवाच्या आकांताने धावताना. वैयक्तिक अपमान आणि मोठेपणा सोडला तरच महान साम्राज्य उभं राहू शकत असं वाटायचं या रावणाला.
स्वतःच्या आईचा अपमान पचवत योग्य वेळेची वाट बघणारा बलाढ्य योद्धा होता हा रावण. त्याच्या इतकी शिवाची निस्सीम भक्ती क्वचितच कोणी केली असेल. आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा रावण माहीतच नव्हता कोणाला. जगाला माहीत होता तो सीतेचे अपहरण करणारा क्रूरकर्मा. त्यात आपल्या टीव्हीवरील मालिकांनी तर त्याला जगातील सगळ्यात बेस्ट व्हिलन करून टाकला. आपल्या मेंदूवरील पूर्वग्रहाचे अनेक जळमट हे पुस्तक काढून टाकत. एक व्यक्ती म्हणून रावणाची बाजू देखील आपल्याला कळते. त्याचा इतिहास, त्याची वैयक्तिक पार्श्वभूमी, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबाची वाताहत, स्वतःच्या वडिलांनी दिलेली अत्यंत वाईट आणि हीन वागणूक हे सगळं आपल्या या पुस्तकातून वाचायला मिळते.
रावण – राजा राक्षसांचा हे पुस्तक रावणाचे उदात्तीकरण आणि रामाला कमी लेखता का ? तारा अजिबातच नाही. या पुस्तकात कुठेही रामाच्या देवत्वाला, चांगुलपणाला धक्का लावलेला नाही. मात्र रावणाची देखील एक बाजू आहे जी तितकीच खरी आहे. तोही एक माणूस होता आणि त्याने त्याच्या लोकांना एकत्र करीत एक साम्राज्य उभे केले आणि लढा दिला. हे सगळं आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.
अतिसुख उपभोगलं कि संघर्षाची अभिलाषा कमी होते . वैयक्तिक विचारांमधून घेतलेल्या निर्णयापेक्षा सामूहिक चर्चेतून घेतलेला निर्णय हा निर्णयक आणि अचूक असतो. या पुस्तकातील रावण जगण्याच्या संघर्षाचा हा मंत्र देतो.
तर रावणाची दुसरी आणि महत्वाची बाजू सांगणारे हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवे आणि संग्रहीदेखील ठेवायला हवे असे आहे.