माय जर्नी

बारामती टू इस्त्राईल,
आज मैं उपर आसमा निचे

मानसी चव्हाण

गावखेड्यातल्या मराठी शाळेत मुळाक्षरे गिरवणं ते इस्राईलमधल्या प्रथितयश विद्यापीठात संशोधन करण्यापर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोप्पा नक्कीच नव्हता. शिक्षणाचा हा भला मोठा अवकाश कवेत घेण्याचा पाया रुजला तो लहान वयातच. बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे गावात वडील ग्रंथपाल म्हणून काम करीत, तर आई घरगुती क्लास घेत प्रपंच चालवायची.

दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच मराठी माध्यमात पूर्ण केलं. रांगोळी, मेंदी, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा अशा सगळ्याच स्पर्धेत सहभाग घेत बक्षिसे मिळवली. बरं हे करत असताना वर्गात अव्वल क्रमांक कधीच सोडला नाही. विज्ञान शाखेतून नाखुशीने का होईना बारावीही पार पडली. घरात वाचनाचं वातावरण असल्यानं जगण्याला समृद्धता येत होती. माणसांच्या जवळ जाणारं आयुष्यात काहीतरी करायचंय हे राहून राहून वाटत होतं.

बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेरीस वकील होण्याची मनाशी खूणगाठ बांधून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात एलएलबीला प्रवेश मिळाला. मात्र एवढा पैसा आणायचा कसा? हा प्रश्न होताच. बेताची परिस्थिती असतानाही आई-वडील बचत गटातून कर्ज उचलून पैशांची तरतूद करायचे अन् वर्षाच्या शेवटाला त्याची व्याजासकट परतफेड करायचे. पाच वर्षांचा अभ्यासक्रम पार पडला तो असा…

दरम्यानच्या काळात रांची विद्यापीठ मानवाधिकार परिषदेत मॉब लिचिंगवर रिसर्च पेपरही प्रसिद्ध केला. कॉलेजच्या वतीने मूट कोर्टाच्या अनेक स्पर्धाही गाजवल्या. करिअरच्या नव्या वाटाही याच काळात खुणावू लागल्या. पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या दिशेनं पाऊलं टाकायला सुरूवात केली. कोरोनाचा काळ आव्हानाचा ठरला. पण याच काळात शोधाशोध सुरू केली.

परदेशात जाण्यासाठी गरजेची असलेली TOEFL परीक्षाही उत्तीर्ण झाले. अखेरीस इस्त्राईलमधील तेल अविव विद्यापीठात एल. एल. एम. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. आयुष्यातला पहिलाच विमान प्रवास असल्यानं मनातही अनेक संमिश्र भावना होत्या. पॅरासोल फाउंडेशनची ३० लाखांच्या फेलोशिपच्या मदतीने तेल अविव विद्यापीठात पुन्हा एकदा वकिलातीचे धडे सध्या गिरवतेय. इस्त्राईलमधून आता ऑक्स्फर्ड, केंब्रीजसारख्या विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न आहे. मानवी हक्क, स्त्रिया, तसेच बालकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. शिक्षणाची कवाडं उघडी ठेवली की सगळं काही स्वच्छ दिसायला लागतं एवढं मात्र नक्की…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये