तरुणांमध्ये हृदय शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले

पुणे : बदलती आणि अस्थिर जीवनशैली आणि कोरोना काळातील ताण-तणाव याचा परिणाम शहरी भागातील तरुण पिढीवर झाला असून, तरुणांमधील हृदय शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुण वर्गात हृदयरोगाचे प्रमाण वाढत जाते. केवळ हे एकच कारण नाही, तर अन्य अनेक सामाजिक, आर्थिक कारणे आहेत. ही बाब एका इंग्रजी वृत्तपत्राने गांभीर्याने मांडली.
२०१७ साली ससून रुग्णालयात अँजिओप्लास्टीच्या ३५६ शस्त्रक्रिया झाल्या. तर, चालू वर्षाच्या (२०२२) ऑक्टोबर महिन्यापर्यंत ४३२ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. शस्त्रक्रियांचा हा वाढता आलेख आणि त्यातही तरुणांचे वाढते प्रमाण हा काळजीचा विषय आहे.
धूम्रपान, मधूमेह अशा कारणांनीही हृदयरोगाचा त्रास होतो. याखेरीज नोकरीबाबतची अस्थिरता, आर्थिक ताण-तणाव, अपुरी झोप, सतत टीव्ही पाहाणे, मोबाईल, लॅपटॉप यावर काम करत राहाणे याचाही परिणाम हृदयरोगाचा त्रास होण्यावर झालेला असल्याचे आढळून आलेले आहे. शिवाय, अलीकडेच तरुणांमध्ये हुक्का ओढण्याचे वाढलेले प्रमाण हेही हृदयरोगाच्या बाबतीतील कारण रुग्णांशी बोलताना जाणवले आहे. कोरोनाबाधीत रुग्ण आणि हृदयरोग याचा काही संबंध आहे का? हेही अभ्यासले जात आहे.
गेल्या काही वर्षात लहान वयात हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे चुकीची जीवनशैली, असमतोल आहार, खाण्यातील फॅटस व फास्ट फूडचे जास्तीचे प्रमाण, व्यायामाचा अभाव, पुरेशी झोप न घेणे, अतिरिक्त मद्यपान व धूम्रपान ही होत. त्यातच अतिरिक्त स्पर्धेतून होणारे ताण तणाव, मानसिक अस्वस्थता व असमाधानी वृत्ती अजूनच भर घालतात. पुरेशी झोप, समतोल आहार, नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम यांनी भरपूर फायदा होतो. धोका असणाऱ्या लोकांनी नियमित मेडिकल चेकअप व रक्त, लघवी व इतर आवश्यक तपासण्या डॉक्टरकडून नक्की करून घ्याव्यात.
— डॉ. दिपाली टोणगावकर
सध्या वाढत्या महागाईमुळे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ बसत नाही. अनेकांना कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत आहे. शिक्षण महाग झाले आहे. यामुळे जास्तीत जास्त काम करुन अस्तित्व टिकविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यातून ताण-तणाव निर्माण होतो. रात्री उशीरापर्यंत टीव्ही मालिका, क्रिकेट, अन्य कार्यक्रम बघत राहाण्याच्या सवयीमुळे झोप अपुरी होते. नोकरीची ठिकाणे घरापासून खूप दूर असतात. तिथे जाताना-येताना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत कामाच्या ठिकाणी वेळेवर जाण्याचे दडपण असते. भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाण्याने आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. तिखट झणझणीत मिसळ, फास्टफूड खाण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे.
या बदलत्या जीवनशैलीतही काही मार्ग शोधून तरुणांनी योगासने, ध्यान-धारणा, वेळच्यावेळी सात्विक आणि ताजा आहार घेणे या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.