
पुणे : केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पिटलने कॅन्सर रुग्णांसोबत दिवाळी साजरी केली. कमांड हॉस्पिटलच्या सभागृहात साजरा झालेला या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
रुग्णांवर सर्वोत्तम मोफत उपचार करणार्या केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पिटलचे कार्य अतुलनीय आहे. ही संस्था म्हणजे कर्करोगाच्या रुग्णांसाठी देव आहे, अशी भावना रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली. ‘दिवाळी विथ परपज’ कार्याक्रमात रुग्णांचे नातेवाईक भावोत्कट झाले होते.
… असे उपक्रम रुग्णांना देतात नवी ऊर्जा
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करताना रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची मानसिक अवस्था जपणे हे रुग्णालयाचे विशेष कसब असते. दुर्धर आजारावर मात करताना ते जीवनातील आनंद विसरुन जातात. त्यामुळे असे उपक्रम रुग्णांना नवी उमेद आणि आजारावर मात करण्यास बळ देणारे ठरतात.
एक आई जशी काळजी घेते, तशी रुग्णांची या ठिकाणी काळजी घेतली जाते. हे हॉस्पिटल एक मंदिरच आहे, ही भावना व्यक्त करताना कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले.
मेजर जनरल बी.के.गोयल, व्हीएसएम कमांडंट, कमांड हॉस्पिटल, पुणे, ले.ज.एम.ए. तुताने, महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री सल्लागार डॉ. सुभाष.आर साळुंके, संस्थेचे संचालक एन.एस. न्यायपथी सोबत कॅन्सर रुग्णांचे नातेवाईक, नर्स, मावशी उपस्थित हेाते.
कर्करोगाच्या उपचारात रुग्णाला तीव्र वेदना होतात. त्यासाठी वेदना व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अनेकदा मृत्यू अटळ असतो. त्या शेवटच्या क्षणापर्यंत वेदनारहित देण्याचा प्रयत्न संस्था करते. मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य संस्था करते. त्याबद्दल नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली.