ताज्या बातम्यारणधुमाळी

“राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाही तर…”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | Sanjay Raut – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. कोणाला मुंबई तोडीयचीय, कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायचीत. गेल्या साडेतीन महिन्यांपासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरू असल्याचंही राऊत म्हणाले. जर लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही तर या राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सगळं सुरू असताना मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तिकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करू नये म्हणजे झालं, असा खोचक टोला संजय राऊतांनी शिंदे सरकारला लगावला आहे. हे सरकार राज्यात आल्यामुळं अनेक राजकीय दरोडेखोरांना असं वाटत आहे की आपण महाराष्ट्राचे लचके तोडू. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यपाल चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजपचे प्रवक्ते देखील चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत. उपमुख्यमंत्री त्याचं समर्थन करत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे. त्यामुळं हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात संजय राऊतांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे बिहारचा दौरा म्हणून बघू नका. ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. या दौऱ्याकडं राष्ट्रीय दौरा म्हणून बघा, त्याला राष्ट्रीय दौरा म्हणून महत्व दिलं पाहिजे. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मदतीनं परिवर्तन घडवून आणलं, अडीच वर्षापूर्वी आम्ही देखील परिवर्तन केलं होतं. आता पुन्हा महाराष्ट्रातच परिवर्तन करण्याची तयारी सुरू झाल्याचा इशाराही राऊतांनी दिला आहे. तसंच आदित्य ठाकरे हे देशातील प्रमुख तरुण नेत्यांना भेटणार आहेत. देशात तरुण नेतृत्वाची फळी निर्माण करुन एक पर्याय म्हणून उभा करण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये