मेंदू हाच सर्वकाही

अशोक सोनवणे, सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर
आपल्या हृदयाची, फुफ्फुसाची हालचाल, आपली जीभ, डोळे, मान, हात-पाय, आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल ही मेंदूमधूनच होत असते. आपल्या सर्व प्रकारच्या ऐच्छिक व अनैच्छिक हालचाली मेंदूमधूनच नियंत्रित होत असतात. आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक विचार, आपली प्रत्येक बौद्धिक आणि मानसिक कृतीसुद्धा मेंदूमधूनच होत असते. मग मित्रहो, आपला मेंदू कसा काम करतो? हे तुम्हाला माहिती आहे का? आपला स्वभाव, स्वभावातील गुण-दोष, आपल्याला लागलेल्या सर्व चांगल्या-वाईट सवयी, आपली शारीरिक व बौद्धिक क्षमता, आपल्या विचाराची परिपक्वता, किंवा धरसोड प्रवृत्ती, प्रयत्नातील सातत्य किंवा अर्धवट सोडून देण्याची सवय, आपल्याला जडलेले विविध आजार, आपल्यातील यश मिळविण्याकरिता काही कौशल्य किंवा दोषसुद्धा हे सर्व आपल्या मेंदूमधूनच घडत असते. त्यामुळे आपल्याला आपला मेंदू कसा काम करतो, हे माहिती असणे आपली मूलभूत गरज आहे.
कोणतीही कृती ही दोन वेळा घडत असते. ज्याप्रमाणे चित्रकाराचे चित्र कोणते काढायचे, हे त्याच्या मेंदूत न्यूरॉन्सच्या जोडण्यातून प्रथम उमटत असते, मगच कागदावर दुसरे चित्र उमटते. कोणता ड्रेस घ्यायचा, कसल्या रंगाचा घ्यायचा, कोणत्या दुकानातून घ्यायचा? किती रुपयापर्यंतचा घ्यायचा, हे प्रथम मेंदू सांगतो, म्हणूनच आपण मेंदू सांगेल त्याप्रमाणे आपण ड्रेस घेतो. आपले विचार, चालणे, बोलणे, पाहणे हे सर्वप्रथम मेंदूतच घडते, नंतर ते प्रत्यक्षात आपल्याला दिसते. आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, परंतु हे तर सर्व ऐकण्याचे, पाहण्याचे आणि बोलण्याचे अवयव आहेत, मेंदू अवयवाकडून ती ती कामे करून घेत असतो. मेंदूच्या सूचनेप्रमाणे सर्व अवयव काम करीत असतात. हृदयाची धडधड असो की, डोळ्यांच्या पापण्याची हालचाल सर्व मेंदूच नियंत्रित करीत असतो. म्हणूनच मेंदूला आपल्या शरीराचा राजा म्हणतात.
राजा बोले दल हाले. या म्हणीप्रमाणे मेंदू जसे सांगतो तसे आपले शरीर काम करते. आपण कितीही साबण लावले, कितीही कोणतीही सौंदर्यप्रसाधने लावली तरी आपली स्कीन उजळत नाही, क्रीमचा परिणाम संपला की, पुन्हा आहे ती स्कीन आपली राहते. त्याचप्रमाणे माणसाची वर्तणूक बाह्य संस्काराने बदलत नसते, जोपर्यंत मेंदूला वळण लावले जात नाही, मेंदूवर संस्कार केले जात नाहीत तोपर्यंत माणसाच्या विचारात किंवा वर्तणुकीत बदल होत नाही. त्यामुळे आपल्याला मेंदूच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घ्यावे लागणार आहे. आपण बाह्य भागावर काम करण्यापेक्षा मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीला समजून घेऊया आणि मेंदूला जे पाहिजे तेच काम करण्याची सवय लावूया. जेणेकरून आपल्या विचारांत व वर्तणुकीत नक्कीच बदल होतो.