एक तरी ओवी अनुभवावी

-प्रकाश पागनीस
!! जय श्री राम !!
!! ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन !!
!! अ. १३ वा. “गुरुसेवेतील विविधता “!!
आज आपण ओवी क्रमांक ४२१ ते ४३० ओव्या निरोपित करणार आहोत.
होईन गुरूंचे आसन! अळंकार परिधान!
चंदन होईन ! उपचार !! ४२१ !!
मीचि होईन सुआरू! वोगरीन उपहारू!
आपणपे श्रीगुरू! वोंवाळीन !!४२२!!
जे वेळी देवो आरोगिती!तेव्हा पांतीकरू मीचि पांती!मीचि होईन पुढती!
देईन विडा !!४२३!!
ताट मी काढीन!सेज मी झाडेन!
चरण संवाहन!मीचि करेन !!४२४!!
सिंहासन होईन आपण!
वरि श्रीगुरू करिती आरोहण!
होईन पुरेपण ! वोळगेचे !!४२५!!
श्रीगुरूंचें मन! जया देईल अवधान!
तो पुढा होईन चमत्कारू !!४२६!!
तया श्रवणाचे आंगणी !
होईन शब्दांचिये अक्षौहिणी!
स्पर्श होईल घसणी!आंगाचिया !!४२७!!
श्रीगुरूंचे डोळे!अवलोकनें स्नेहाळे!
पाहति तिये सकळे!होईन रूपें !!४२८!!
तिये रसने जो जो रुचेल!
तो तो रसु म्यां होईजेल!
गंधरुपे कीजेल! घ्राणसेवा !!४२९!!
एवं बाह्यमनोगत! श्रीगुरुसेवा समस्त!
वेंटाळिन वस्तूजात ! होऊनियां !!४३०!!
भावार्थ : ४२१ ते ४३० :-
श्रीगुरू ज्या आसनावर आरूढ होतील ते आसन मी होईन. गुरुंचे अंगावर दागिने चढविन चंदनादी सुगंधी द्रव्यांनी त्यांची काया सुगंधित करेन. मी पंगतीचा आचारी होऊन श्रीगुरूंचे भोजन तयार करेन. वाढपी होऊन भोजन वाढेन. गुरूंना औक्षण करेन. गुरू भोजन करतील तेव्हा मी त्यांचे पंगतीला बसून जेवण करेन. गुरूंचे भोजन झाल्यावर त्यांना विडा देईन.
उष्टी खरकटी मी काढेन. गुरूंच्या वामकुक्षी पूर्वी त्यांची शय्या तयार करेन. त्यांना झोप येईपर्यंत पाय चेपेन. त्यांचे सिंहासन मी होईन. या सिंहासनावर गुरू बसतील. त्यांच्या प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. श्रीगुरूंची एकाग्रता मी होईन आणि चमत्कार करून दाखवेन. श्रोत्यांसाठी ते बोलू लागतील तेव्हा मी त्यांच्यासाठी लक्षावधी शब्दांचे रुपातून प्रकट होईन. त्यांना स्पर्श करणारे मृदुत्व मी असेन. श्रीगुरू जेव्हा जिकडे प्रेमाचे नजरेने पाहतील ती नजर मी असेन. त्यांच्या नजरे समोरचे दृष्यसुद्धा मीच असेन. जे जे पदार्थ त्यांना खावासा वाटेल ते ते चवदार पदार्थ रसदार पदार्थ मीच होईन. त्यांना आवडेल असा सुगंधी पदार्थ मी होईन. अशा रीतीने त्यांना बाह्यजगतातील भोग घ्यावेसे वाटतील ती भोग्यवस्तु मी होईन. श्रीगुरूंची सेवा आणि ईश्वर सेवा माऊली वेगळी मानित नाहीत. आत्म्याचे अमरत्व नरनारायणांची गोष्ट आपल्याला उद्याचे निरुपणात जाणून घेता येईल. अर्थात, या मतितार्थाने जाणण्याची गोष्ट आहे.
!!तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी!!