ताज्या बातम्यारणधुमाळी

“रश्मी ठाकरेंना शक्तीप्रदर्शन करून…”, शिंदे गटाचा खोचक टोला

मुंबई | Shinde Group On Rashmi Thackeray – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी काल (29 सप्टेंबर) ठाण्यात येऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कारण ठाणे हा एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) बालेकिल्ला मानला जातो. रश्मी ठाकरे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरोत्रौत्सवात सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र, ही गर्दी बाहेरून आणण्यात आली होती, असा दावा शिंदे गटाकडून (Shinde Group) करण्यात आला आहे. तसंच रश्मी ठाकरेंनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केल्याची टीकाही शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

रश्मी ठाकरेंनी काल टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिथे आरतीदेखील केली. तसंच त्यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचंही दर्शन घेतलं. यावेळी ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. यानंतर शिंदे गटाच्या ठाणे महिला संघटक आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Minakshi Shinde) यांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला.

“हे काही शक्तीप्रदर्शन करण्यातं स्थान नाही. शक्तीप्रदर्शनासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे वेळ दिली आहे. तेव्हा जर शक्तीप्रदर्शन केलं तर ते चालू शकेल. इथे शक्तीप्रदर्शन करून कोणतंही चिन्ह मिळणार नाही. कारण देवीच्या हातात धनुष्यबाण नाहीये, त्रिशूळ आहे. त्यामुळे इथे येऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नव्हती”, अशी टीका मीनाक्षी शिंदे यांनी रश्मी ठाकरेंवर केली आहे.

पुढे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, “काल आम्ही म्हणालो होते की रश्मी वहिनी आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण आम्हाला कळलं की ठाण्यातल्या महिला आघाडीपैकी कुणीच त्यांच्यासोबत नाही. म्हणून मुंबईबाहेरून त्यांना गर्दी मागवावी लागली. दुपारी तीन वाजल्यापासून ठाण्याकडे बसेस रवाना करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात श्क्तीप्रदर्शन करण्यात आलं “.

“त्यांनी सांगितलं की आम्ही दर्शन घ्यायला येतोय. पण इथे आल्यावर त्यांनी माईकवर घोषणाबाजी केली. बाहेरच्या लोकांना घेऊन शक्तीप्रदर्शन करून त्या गेल्या. हा इव्हेंटच होता. आरती केली असं कुठंच वाटलं नाही”, असा टोला देखील मीनाक्षी शिंदे यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये