क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर गोळ्या घालून आम्हाला संपवून टाका! ईडीच्या जाचाला कंटाळून मुश्रीफांच्या पत्नीची संतप्त

कोल्हापूर : (ED Raid on Hasan Mushrif House Kagal) मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) ईडीच्या (ED) रडारवर असून ईडीच्या पथकानं आज पुन्हा एकदा त्यांच्या कागलमधील घरावर धाड टाकली आहे. ईडीचे चार ते पाच अधिकारी पहाटे 5 पासून मुश्रीफ यांच्या घरीची झाडाझडती करत आहेत. मागच्या दोन महिन्यातील ईडीची मुश्रीफ कुटुंबिंयावरती ही तिसरी कारवाई आहे.

दरम्यान, मागील काही तासांपासून ईडीचे चार ते पाच वरिष्ठ अधिकारी मुश्रीफांच्या घरी चौकशी करत आहेत. तब्बल पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. मुश्रीफांवरील कारवाईनंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. ईडीकडून सुडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा आरोप समर्थकांकडून यावेळी करण्यात येत आहे.

ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफांच्या पत्नीनंही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सायरा मुश्रीफ म्हणाल्या, तुम्ही सगळेजण शांत राहा आणि त्यांना (ED ला) सांगा आम्हाला आता गोळ्या मारा, हे सांगताना मुश्रीफांच्या पत्नीला अश्रू अनावले होते. यावेळी मुश्रीफांच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यांचे समर्थक कागलमधील घरी जमू लागले आहेत. सध्या कागलमध्ये तणावाचं वातावरण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी सांगितलं की, घरी कोणी पुरूष नाही. लहान मुलं व महिला आहेत. मुलांना ताप आहे आणि ईडीचे अधिकारी अरेरावी करीत आहेत. सीआरएफच्या महिला पोलिसांनी सायरा मुश्रीफ यांना घरात जाण्यास सांगितलं. यावेळी भैय्या माने व कार्यकर्त्यांनी सायरा मुश्रीफ यांना आम्ही सर्वजण मुश्रीफ साहेबांसोबत असल्याचा शब्द दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये