ताज्या बातम्यामुंबईरणधुमाळीराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

नवे राजकीय समीकरण होण्याची जोरदार चर्चा

संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

संभाजीराजेंच्या भूमिकेकडे भाजपचे लक्ष
-संभाजीराजे छत्रपती त्यांचे नेतृत्व हे सर्व समाजासाठी असून, ओबीसी समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते पाठपुरावा करणार आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून छत्रपती संभाजीराजे यांना खासदारकी देण्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील संकेत दिले होते, मात्र माझी भूमिका मी १२ तारखेला स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले आहे.

मुंबई : राज्यसभेची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती लवकरच आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. यासाठी संभाजीराजेंनी १२ मे रोजी पुण्यात आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे कोणत्या पक्षात जाणार आणि काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी काम केले. त्यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे माझे नेतृत्वदेखील सर्वांसाठी असेल. पुढील काळातही सर्वांचेच नेतृत्व करण्याची तयारी असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. त्यांच्या खासदारकीच्या सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपली ही भेट केवळ आभार व्यक्त करण्यासाठी होती, असे त्यांनी सांगितले.


राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मोर्चे निघत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेत खासदारकी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. मधल्या काळामध्ये खासदारकीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे खासदारकी दिल्याबद्दल फडणवीस यांना भेटून आपण आभार मानले असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी १२ तारखेला समर्थकांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझे नेतृत्व हे सर्व समाजासाठी असून, ओबीसी समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. राज्यातील मराठा समाजातील आंदोलन हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच दिसून आले. मुख्यमंत्रिपदी मराठेतर चेहरा असल्यामुळे मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे भाजपसोबत असल्यास त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे भाजपचे देखील लक्ष असेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये