काँग्रेस दोन्ही गृही उपाशीच

पद ना मिळे किंमत; विधानसभेत ना लोकसभेत…
घावेल ते पावेल…
आज विधान परिषदेतला विरोधी पक्षनेता कोण असावा, याबाबत या तिन्ही पक्षांत चर्चा झालेली नाही ना विचारविनिमय. ज्याला जे मिळवता येईल ते मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातून दि. २२ ऑगस्टपर्यंत सध्याच्या सरकारचे काही घडेल असे वाटत नाही. तशात अधिवेशन दि. १७ ऑगस्टला होणार असल्याने काँग्रेस दोन्ही घरी उपाशीच राहणार.
पुणे : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्याचे घोषित केले आहे. त्यावरून सुरू असलेल्या नाराजीनाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या शिवसेनेवरील नाराजीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. पण सत्य एक आहे काँग्रेस दोन्ही गृही उपाशीच आहे.
महाराष्ट्रात शिंदे-भाजप गटाने सरकार स्थापन केले. यादरम्यान िवधानसभेला अध्यक्ष नव्हते ॲड. राहुल नार्वेकर यांची नियुक्ती त्या पदावर करण्यात आली.आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड शिवसेनेने अंबादास दानवेंच्या नियुक्तीने केली.
यात काँग्रेस दोन्ही सभागृहात कुठेच दिसत नाही. सत्तेत असताना विधानसभेचे अध्यक्ष नेमण्यासाठी केलेली दिरंगाई काँग्रेसला महागात पडली. शरद पवार यांच्या पसंतीचा अध्यक्ष असावा, अशी चर्चा होती. अध्यक्षपदावर पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती होऊ नये, यासाठी बरीच माथापच्ची करण्यात आली. अध्यक्षपद होते ते नाना पटोलेंनी सोडले आणि आता विधान परिषदेच्या नेतेपदासाठी हालचाली सुरू केल्या, मात्र त्याही निरुपयोगी ठरल्यात.
विधानसभेचे अध्यक्षपद गेले भाजपकडे. परिषदेचे सभापती पद रामराजे म्हणजे राष्ट्रवादीकडे.विधानसभेचे उपाध्यक्षपद नरहरी झिरवळ म्हणजे राष्ट्रवादीकडे, तर विधान परिषदेचे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणजे शिवसेनेकडे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपद अजित पवार म्हणजे पुन्हा राष्ट्रवादीकडे तर आता विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवे म्हणजे शिवसेनेकडे गेल्यात जमा आहे. काँग्रेसला ते सत्तेत असताना ना उपमुख्यमंत्रिपद, ना अर्थ, गृहमंत्रिपद मिळालं. केवळ सत्तेत सहभाग एवढेच त्यांचे बक्षीस होते.