“म्हणून मी मुख्यमंत्री पदावर बसलो”; उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी भूकंप घडवून आणल्यानंतर शिवसेना मुळापासून हादरून गेली आहे. संतप्त शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटी फेसबुक लाईव्ह करून जनतेशी आणि शिवसेनेतील गायब झालेल्या आमदारांशी संवाद साधला आहे. अनेकदा उद्धव ठाकरे अनुभव नसताना मुख्यमंत्री पदावर कसेकाय बसले असा प्रश्न पक्षांतील लोकांकडून विचारला जातो. त्या प्रश्नाचा खुलासा आज मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदासाठी मी नकार देत होतो मात्र, शरद पवारांनी मला या पदावर बसण्यासाठी आग्रह केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
सत्ता स्थापनेवेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या काय चर्चा झाली होती?
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळचा मुख्यमंत्री पदासाठीचा किस्सा सांगितला. त्यावेळी शरद पवार यांनी तिन्ही पक्षांची बैठक बोलवून घेतली होती. महाविकास आघाडी स्थापनेची चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी मला बाजूला बोलवून घेतलं आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धवजी तुम्हालाच जबाबदारी घ्यावी लागणार आहे असं ते म्हणाले. त्यावेळी त्यावर मी म्हटलो साहेब मस्करी करताय काय? तर ते म्हणाले मस्करी नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडे जेष्ठ नेते आहेत. मात्र शिवसेनेकडून तुम्ही मुख्यमंत्री असाल तर पक्ष टिकून राहील. त्यावर मी म्हणालो, साहेब मी फक्त महापालिकेत महापौर जिंकल्यानंतर फक्त अभिनंदन करायला जातो. महानगरपालिका न जिंकलेला माणूस मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो. तर तेव्हा पवार म्हणाले तुम्हाला हे करावं लागेल.