नोकरीची १०० टक्के हमी देणारी जाहिरात करण्यास कोचिंग क्लासेसना बंदी

नोकरी किंवा निवडीची १०० टक्के हमी देणारी जाहिरात करण्यास कोचिंग क्लासेसना बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यासोबतच केंद्र सरकारने कोचिंग क्लाससद्वारे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. खोटे दावे करणाऱ्या कोचिंग क्लासेसना प्राधिकरणाने आजपर्यंत ५४ नोटिसा जारी केल्या आहेत आणि सुमारे ५४.६० लाखांचा दंड ठोठावला आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे म्हणाल्या की, कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांपासून जाणूनबुजून माहिती लपवत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे कोचिंग उद्योगाशी निगडित लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे कोचिंग क्लासेसच्या विरोधात नाहीत मात्र जाहिरातींच्या दर्जामुळे ग्राहकांच्या हक्कांवर गदा येऊ नये म्हणून आहेत, असे त्या म्हणाल्या.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोचिंग क्लासेसकडून शिकवला जाणार अभ्यासक्रम आणि कालावधी याबाबत खोटे दावे करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रमाणपत्रे, प्रवेश शुल्कची संरचना, फी परताव्याचे धोरण, निवडीची किंवा नोकरीची हमी, यासारख्या गोष्टींबाबत खोटे दावे करण्यास सरकारने बंदी घातली आहे.
एखाद्या विद्यार्थ्याची नोकरीसाठी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडून लेखी संमती मिळाल्याशिवाय कोचिंग क्लासेस यशस्वी उमेदवारांची नावे, छायाचित्रे किंवा प्रशस्तिपत्र जाहिरातीसाठी वापरू शकत नाही, असेही सरकारने म्हटले आहे. सदर मार्गदर्शक तत्त्वे शैक्षणिक मार्गदर्शन आणि शिकवणी देणाऱ्या क्लासेससाठी आहेत. मात्र, समुपदेशन, खेळ आणि सर्जनशील गोष्टींचे मार्गदर्शन करणाऱ्या शिकवण्यांसाठी नाहीत. या मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन केल्यास ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत दंड आकारला जाईल, असे सचिव निधी खरे यांनी सांगितले.