गणेशोत्सवाचा पुण्यातला उत्साह लाखमोलाचा; अर्थकारण असते हजार कोटींचे !

पुणे – Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवासाठी पुणे शहर सजले आहे. बाजारापेठा गर्दींनी गजबजल्या आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे सार्वजनिक गेणेशोत्सवाला खीळ बसली होती. उत्सवातले चैतन्य हरपले होते.मात्र यंदा या सावटातून गणेशभक्त बाहेर पडत आहेत. उत्सव, सणाच्या माध्यमातून फिरणाऱ्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. पुण्यात विविध क्षेत्रांमुळे होणारी सर्वसाधारणपणे किमान हजार ते अकराशे कोटी रुपयांची, तर महाराष्ट्र राज्यात सुमारे २० हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
गणेशोत्सवासाठी पुण्यात येणारे, तसेच विविध पुण्याच्या बाजारपेठेत होणारी आर्थिक घडामोड लाखो रुपयांची असते.सर्वसाधारणपणे समजून येणारी, अंदाज बांधता येणारी उलाढाल अकरा हजार कोटी रुपयांपर्यंत होते. यात पर्यटक, व्यापारी, विविध कंपन्यांच्या उत्पादनांचे उत्पादक, सेवा क्षेत्र, करमणूक, विविध क्षेत्रातल्या तंत्रज्ञांपासून अगदी मंदिरांसमोर पोत्यावर किरकोळ वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा अंतर्भाव आहे. उत्सवासाठी परगावी, विशेषत: कोकणात जाणार्या चाकरमान्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे गणपती पाहायला पुण्यात येणार्या इतर गावांमधल्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. याच काळात सार्वजनिक परिवहन सेवेचं उत्पन्न ४० टक्क्यांहून अधिक वाढते. सुमारे २०० वर परदेशी पर्यटक याच काळात उत्सवासाठी पुणे मुक्कामी येतात. कृषी उत्पन्नाच्या बाजारपेठेत फुलं, फळं आणि नारळ यांची प्रचंड आवक होऊन, उठावदेखील असतो.
भक्तांचा प्रतिसाद
गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाचा किमान खर्च हा २ लाखांच्या घरात असतो. शहर परिसरात घरगुती गणपतींची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. घरटी सुमारे दोन हजार रुपये किमान खर्च होतो. ही आकडेवारी गृहित धरली तर पुण्यातल्या खर्चाचा आकडा एक हजार ते अकराशे कोटी रुपयांहून अधिक होतो. राज्याचा विचार केला तर हा खर्च सुमारे वीस हजार कोटी रुपयांहून अधिक असतो, असे मत सामाजिक आणि आर्थिक अभ्यासक अशोक ढगे यांनी व्यक्त केले.
हलवाई, मिठाईवाले आणि घरगुती व्यावसायिकांकडे प्रसादासाठी मोठी मागणी असते. सजावटीसाठी विद्युत रोषणाईच्या माळा, दिवे यांच्या व्यवसायात लखलखाट असतो. इलेक्ट्रॉनिक घरगुती वस्तूंना मागणी वाढते. छोट्या-मोठ्या वाहनांच्या खरेदीला गणरायाच्या आगमनाचा मुहूर्त शुभ मानला जातो. गणेशोत्सवासाठी जाहिराती, प्रायोजक मिळवून देणारे उद्योजक, त्यांचे प्रतिनिधी, जाहिरात व्यावसायिक हे अनेक बड्या मंडळांच्या अर्थकारणाचा कणा ठरतात.
बांधकाम व्यावसायिकांसाठी हा उत्सव पर्वणी ठरतो. अनेक ठिकाणी त्यांच्या झळकणार्या जाहिरातींचे दर आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असतो. करमणुकीच्या क्षेत्रातले कलाकार, कंत्राटदार यांच्यासाठीही हा काळ सुगीचा ठरतो. ध्वनिवर्धक आणि रोषणाईचे कंत्राटदार नवनव्या तंत्राद्वारे उत्सवी सहभाग वाढवतात.
उत्सवात जोम धरणार्या अर्थकारणाचा सजगतेने विचार केल्यास ते समाजाला उपयुक्त आहे, हीच बाब प्रकर्षाने जाणवते. पूजेचं तबक, त्यातलं साहित्य आणि मंडप ही एकात्मतेची प्रतीकं आहेत. मूर्तीसाठी शाडू, प्लास्टर हे गुजरातच्या कच्छ भागातून येतं. रंग मुंबईमध्ये तयार होतात, तर कारागीर हे प्राधान्यानं पेण, अहमदनगर, कोल्हापूर भागातले असतात. हळदी-कुंकवाची पेव उत्तर प्रदेशातून, तर नारळ, तांदूळ दक्षिणेकडून येत असतात. पूजेचे पाट, मखरं राजस्थानचे कलाकार बनवतात.
गणेशचरणी हार, फुले अर्पण करण्यासाठी, शेतकरी, वाहतूकदार आणि सजावटकारांची संघटित मालिका उपयुक्त ठरते. कृत्रिम फुलं पंजाबमधून येतात. मंडपासाठी ताडपत्री पश्चिम बंगालमधून, तर बांबू, वासे आसाममधून येतात. या सर्व मानसिक, शारीरिक आणि आर्थिक गुंतवणुकीतून, उत्सवामध्ये अप्रत्यक्षरीत्या समरसतेची भावना निर्माण होत असते.