“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करू नये”

अमरावती | Ravi Rana On Uddhav Thackeray – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं होतं. त्यानंतर 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत चांगलीच फूट पडली असून त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहीलं आहे. या बंडानंतर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे.
तसंच आता शिवसेना नेमकी कोणाची?, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार?, याचा फैसलाही निवडणूक आयोेगापुढे होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. ती मुलाखत आज 26 आणि 27 जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. याच संदर्भात आमदार रवी राणा यांनी या मुलाखतीवर जोरदार टीका केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी रवी राणा म्हणाले, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे फिक्सिंग मॅच आहे. मुलाखतीत संजय राऊत यांचेच प्रश्न असून उद्धव ठाकरेंनी उत्तर काय द्यायचं हे ही राऊतांनीच आधीच ठरवलेलं आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊतांची कटपुतली झाले आहेत. परंतु, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करु नये. कारण, शिंदे गटाचीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.