सत्तेची गुलामी

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.मोदीलाटेनंतर अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून दिली. काहींनी जी-२३ सारखा गट स्थापन केला. मात्र काँग्रेसमध्ये राहून काँग्रेस सुधारली पाहिजे. गतवैभवाला नेली पाहिजे. केवळ नेतृत्वाला दोष देऊन आणि पक्ष सोडून समस्या सुटणार नाहीत. आझाद यांनी सत्तेची गुलामी करण्यात आयुष्य घालवले ती मिळणार नाही, असे वाटल्याने ते अस्वस्थ झाले.
राजकारणात वारं अर्थातच सत्त्व संपलं की राजकारण्यांना आपण संबंधित पक्षाचे कसे एकनिष्ठ होतो, हे सांगणे क्रमप्राप्त होते. पक्षाकरिता आपण कशा खस्ता खाल्ल्या आणि असे असताना पक्षश्रेष्ठींंनी आपल्याला कसे डावलले, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. बरं त्यात तरुण, होतकरू, काम करणारा नेता असेल तर त्याचे ऐकले जाते. समजून घेतले जाते.मात्र गुलाम नबी आझादसारख्या काँग्रेस पक्षात पन्नास वर्षे काढलेल्या व्यक्तीने पन्नास वर्षांच्या नेत्यावर टीका करत, आपण कसे पक्षहिताचे काम करीत होतो, हे सांगणे म्हणजे राजकारणात आपल्या मुला-बाळांची दुसरी इनिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे होय. गुलाम नबी आझाद देशातल्या अशा नेत्यांपैकी आहेत ज्यांनी पक्ष, राजकारण, शासनातली अत्यंत महत्त्वाची पदे सांभाळली, भोगली. गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे म्हणून काम केले. मुस्लिम तसेच काश्मिरी म्हणून पक्षाकडून लाड करून घेतले.
कुठे काश्मीर आणि कुठे अकोला तरी वाशिम मतदारसंघातून लोकसभेला त्यांना विदर्भातल्या मतदारांनी केवळ काँग्रेस आणि गांधी घराण्यावरच्या प्रेमामुळे निवडून दिले.अशा परिस्थितीत आज खरे तर ज्या वयात विचारल्या, तर गोष्टी सांगीन युक्तीच्या चार असे परिपक्वतेने आचरण करण्याच्या वयात नवा पक्ष आणि काश्मीरमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी आणि पक्ष यंत्रणेवर त्यांनी टीका केली ती अयोग्य आहे.हे सत्य आहे, की काँग्रेस पक्षात पक्षाला दिशा देईल, असा नेता उरलेला नाही. २०१४-१५ पासून गेल्या आठ वर्षांत अनेक महत्त्वाचे नेते पक्ष सोडून निघून गेले. त्यावेळी ईडी आणि इतर संस्थांचा दबाव नव्हता, तरीही मतभेदाने ते पक्ष सोडून गेले. तेव्हा ते मोदी फाईड ही नव्हते. असे असताना ही मंडळी पक्ष का सोडतात, याचा गांभीर्याने पक्षाने विचार करायला पाहिजे होता. मात्र राज्यसभेची धुरा सांभाळायला मिळते का, २०१९ मध्ये पक्ष सत्तेत आला तर मंत्रिपद मिळते का, याचा विचार करून पक्षात टिकून राहिलेल्या आझादांनी आता नव्या पक्षाची स्थापना करण्याचे आहे. काँग्रेस पक्षाच्या २०१४ च्या निवडणुकीनंतरच्या कामकाजाच्या पद्धतीत अनेक बदल झाले. झाले म्हणजे मोदींच्या लाटेपुढे काँग्रेस हतबल झाली. दिशाहीन झाली. यात पक्ष सोडून जाणारी आझादांपर्यंतची सगळीच मंडळी होती.आज नाही उद्या लोकसभा नाही देशातील विधानसभा आपल्या ताब्यात राहतील, येतील असे काँग्रेसींना वाटत होते.
मात्र लोकसभेपाठोपाठ विविध निवडणुकांमध्ये आलेले अपयश,भरकटलेली मंडळी, उत्तरोत्तर मोदी सरकार करीत असलेला सरकारी यंत्रणांचा वापर आणि काँग्रेसची संपत चाललेली सद्दी यामुळे अनेक वर्षे सत्ताकारणात असलेली विशेष महत्त्वाची ही मंडळी नैराश्याने ग्रासली आहेत आणि बाहेर पडत आहेत. यातली पहिली व्यक्ती होती नजमा हेपतुल्ला. ज्यांनी भाजपबरोबर संधान साधून आजमितीस राज्यपालपद पदरात पाडून घेतले आहे. अहमद पटेल शेवटपर्यंत गांधींबरोबर राहिले.मात्र त्यांच्यामुळे इतर मंडळी गांधींपासून दूर राहिले, असा आक्षेप आहे. खरे तर पं. नेहरू यांच्या जवळच्या मंडळींना इंदिरा गांधींनी दूर केले. इंदिरा गांधींच्या जवळच्या मंडळींना राजीव गांधींनी दूर केले.
आता राहुल गांधी तोच कित्ता गिरवत आहेत. मात्र राहुल गांधी यांनी २००९ मध्ये तयार केलेली यंग ब्रिगेड ना त्यांना सांभाळता आली ना वाढवता आली.त्यांचा तोटा आज काँग्रेस पक्षाला होतो आहे नि आझादांसारख्या संधिसाधू मंडळींना बोलण्याची संधी मिळत आहे. आझाद मुलगा सद्दाम याला सोबत घेऊन ते नवा पक्ष काढत आहेत.काढला तर त्यांना काँग्रेसमध्ये अडचणीचे वाटत होते, ते त्यांनी त्यांच्या पक्षातून कमी करावे. लोकशाहीत अनेक पक्ष नेते, विचार असेले पाहिजेत. आझादांच्या लोकशाही बळकट करण्याच्या या मोहिमेस शुभेच्छा…!