प्रशासनाकडून ५०० टन कचर्याची विल्हेवाट

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून स्वच्छता, आरोग्याची पाहणी
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात येणा वारकरी व भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नदीपात्र, मंदिर या ठिकाणी भेट देऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा, तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सोई-सुविधांची पाहणी केली.
या प्रसंगी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, प्रशांत बेडसे, राजेश चव्हाण, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली व आरोग्य केंद्रात आतापर्यंत किती भाविकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली, याचीही माहिती घेतली.
यात्रा कालावधीत नगरपालिकेकडून भाविकांसाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला असून, पंढरपूर शहरात दैनंदिन ४० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठ दिवसांत ३२० एमएलडी शुद्ध पाणीपुरवठा केला आहे, तसेच शहरातून आतापर्यंत ५०० टन कचरा उचलण्यात आला आहे. वेळोवेळी औषध फवारणी करण्यात येत असून, स्वच्छता राखली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
दि. १ ते १० जुलै २०२२ या कालावधीमध्ये सुमारे तीन लाख ६४ हजार ६८० भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सुमारे ४४ हजार ८८० भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले आहे. सुमारे ३ लाख ७६ हजार ३२४ भाविकांनी मुखदर्शन घेतले असून, भाविकांना दर्शनरांगेत, तसेच दर्शनमंडपात मंदिर समितीमार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.