दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॅा. विश्वास मेहेंदळे यांचं निधन

मुंबई | Vishwas Mehendale – दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॅा. विश्वास मेहेंदळे (Vishwas Mehendale) यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यानंतर ते मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तसंच आज (9 जानेवारी) दुपारी मुलुंड पूर्व येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. (Vishwas Mehendale Passed Away)
डॅा. विश्वास मेहेंदळे हे वृत्तनिवेदकासोबतच ते प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक देखील होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. एकच प्याला, नांदा सौख्य भरे, प्रेमा तुझा रंग कसा अशा विविध नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. तसंच त्यांचा ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रम लोकप्रिय होता.
दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसंच मुंबई दूरदर्शनचे ते पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचं संचालकपद भूषविलं होतं.
साहित्यिक म्हणूनही डॅा. विश्वास मेहेंदळे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. मला भेटलेली माणसे, नरम गरम, आपले पंतप्रधान हा कथासंग्रह अशा 18 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं होतं. तसंच सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केलं होतं.