मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील एसटी बस सेवा बंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?

छत्रपती संभाजीनगर | Maratha Protest : आज छत्रपती संभाजीनगर जिल्हातील एसटी बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कारण मागील दोन दिवसांपासून बीड आणि नांदेड जिल्ह्यातील एसटी बसेसवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली होती. तर काही ठिकाणी बसेस पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे संभाजीनगरमधील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. तसंच मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांकडून आता गावबंदी करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांना गावांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे.
तर मराठा आंदोलकांकडून एसटी बसेसवर दगडफेक केली जात असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. संभाजीनगरमधील मुख्य बस स्थानकातून पैठण, बीड, कन्नड, जालना येथे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, सध्या पुणे आणि सिल्लोड या महामार्गावरील बसेस सुरू आहेत. तसंच आम्ही सर्व मार्गांवरील पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या सूचनेनुसार बस सोडण्याचा निर्णय घेणार आहे.