अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

एक तरी ओवी अनुभवावी

प्रकाश पागनीस

।।जय श्री राम ।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन ।।
।।अ.१३वा.” मनाचे सामर्थ्य”।।

सर्व कर्मामागे मनच प्रेरक आहे. ही आताचे निरुपणात माऊलींनी स्वीकारलेली गोष्ट आहे.
आता मन तयाचें । सांगो म्हणो जरी साचे ।
तरी सांगितले कोणाचे । विलास हे ।।२९२।।
मनासंबंधी काय सांगो. हे सारे कार्य मनाकडून होत जाते.
काई शाखा नव्हे तरू । जळेवीण असे सागरू ।
तेज आणि तेजाकारू । आन काई ।।२९३।।
झाड आणि फांद्या वेगळ्या नसतात. सागर आणि पाणी वेगळे नसते. तेज आणि त्याची प्रेरणा असलेला सूर्य अथवा दीप वेगळे कसे. असतील तसे. मन आणि देह यांचा संबंध अतूट आहे.
अवयव आणि शरीर । हे वेगळाले काई किर ।
की रसू आणि नीर ।सिनी. आथी ।।२९४।।
शरीर आणि मन परस्पर अवलंबित घटक आहेत. जसे पाणी आणि रसत्व समान आहेत.
म्हणोनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव ।
ते मनची गां सावयव । ऐसे जाणे ।।२९५।।
म्हणून शरीर आणि अहिंसात्मक कार्य बाह्य गोष्टी आहेत. मनच. यामागील अांतरिक प्रेरणा आहे.
जे बीज भुवी खोविले । तेचि वरि रुख जाहले ।
तैसे इंद्रियांद्वारी फांकले । अंतरचि ।।२९६।।
एखादी कोय पेरली तर आंब्याचे झाड उगवते तसे जे कर्म अहिंसात्मक असते खरोखरच सत्कर्म असते.
पै मानसीचि जरी । अहिंसेची अवसरी ।
तर कैची बाहेरी । वोसंडेल ।।२९७।।
मनात जर अहिंसात्मक कर्माचा विचार असला तरच कर्म अहिंसात्मक होईल.
आवडे ते वृत्ती किरीटी । आथी मनौनि उठी ।
मग ते वाचे दिठी । करांसी ये ।।२९८।।
चांगले काम हातून घडावे असे मनात आले तर वाचा दृष्टीतून आखणी होते. मग हात कार्यरत होतात.
वाचूनि मनीचि नाही । ते वाचेसि उमटेल काई।
बीजे वीण भुई । अंकुर असे ।।२९९।।
मन जर स्वार्थी विचारांनी भरलेले असेल तर चांगल्या कामाविषयी तो निंदानालस्ती करेल. मग कार्य घडेलच कसे. जसे जमिनीत बीज पेरलेच नाही तर अंकुर येणार कसा.
उगमिची वाळुन जाये । ते वोघी कैसी वाहे ।
जीवु गेलिया आहे । चेष्टा देही ।।२०२।।
जर नदी आरंभाला आटली तर ती प्रवाहित कशी होईल, जसे माणसाचा प्राण गेला तर तो प्रेत होतो तो काम करू शकत नाही.
म्हणोनि मनपण मोडे ।ते इंद्रिया आधीच उबडे।
सूत्रधारेवीण साईखडे ।वावो जसे ।।३०१।।
म्हणून सगळ्यांचे प्रेरक मनच आहे मनाशिवाय इंद्रिये काहीच कामाची नाहीत.जसे कठपुतली बाहुल्या दोरी सूत्रधार नसेल तर उपयोगाच्या नाहीत.
देवाला एकच प्रार्थना करावी, देवा माझ्या हातून सद्कर्माचे आचरण व्हावे.
।।मनाचिये गुंती गुंफियेला शेला
बाप रखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला ।।

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये