सुशिक्षित शेतकरी उद्योजक आणि ‘मधुपुष्प’

शेतकरी कुटुंबातील शिक्षित तरुणांनी मधाचे नवीन स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू केलं. स्वतः शेतात फिरत सुरू केलेलं स्टार्टअप सध्या ‘मधुपुष्प’ नावाने अनेक जिल्ह्यांत मध आणि अनेक नैसर्गिकरीत्या मिळवलेले पदार्थ उपलब्ध आहेत.
मोठमोठ्या शहरांमध्ये वेगवेगळया क्षेत्रांत हजारो नवनवीन स्टार्टअप्स येतात. अनेक यशस्वी होतात तर काही अयशस्वी. मात्र शेती संबंधित नवीन आणि अनोखे स्टार्टअप्स समोर येताना खूप कमी वेळा पाहायला मिळतात. कारण स्टार्टअपच्या वृद्धीसाठी लागणारं भांडवल शेतकर्यांकडे कमी असतं आणि त्यातही अडचणी जास्त आणि माहिती कमी असल्यानं त्यात न पडणंच बरं असा विचार ते करतात. मात्र सगळ्या कारणांना मागे सारत सातार्याच्या दोन तरुणांनी आपलं मध विक्रीचं ‘मधुपुष्प’ हे स्टार्टअप महाराष्ट्रभर नेलं आहे.
प्रतीक करपे आणि सतीश शिर्के या दोन तरुणांनी २०१७ साली एक नवीन प्रयोग केला. मधमाशी पालन आणि मध विक्रीचा. शेतकरी कुटुंबातून आलेले दोघेही उच्चशिक्षित आहेत. प्रतीक यांचे इंजिनीअरिंग तर सतीश यांचे अॅग्रीमध्ये शिक्षण झालेलं आहे. सुरुवातीला दोघांनीही स्वतःच मधमाशी पालन आणि मध जमा करण्याचं काम केलं. त्याचबरोबर मधाची पॅकिंग आणि बाजारात जाऊन विक्री देखील दोघेच करत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन वेगवेगळया प्रकारचे मध कसे मिळवता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने मध तयार करण्याची प्रक्रिया त्यांनी माहिती करून घेतली. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत लोकप्रिय असलेले ‘मधुपुष्प’ हे लोकप्रिय होत आहे. पुणे, बीड, सातारा, मुंबई आणि पाश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या आऊटलेटमध्ये ते उपलब्ध आहे.
महाराष्ट्रात कोठेही न मिळणा तुळशी, ओवा, लिंब, जांभूळ अशा अनेक वनस्पतींपासून मिळवलेला मध ‘मधुपुष्प’ मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर गाईचे तूप, चॉकलेट गुलकंद, मधापासून तयार केलेले चॉकलेट असे अनेक आयुर्वेदिक पदार्थ देखील ‘मधुपुष्प’ मध्ये सध्या उपलब्ध आहेत.