ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल नाही केला तर…’; लक्ष्मण मानेंचा इशारा

सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्याला हात घातल्यानंतर १२ एप्रिलच्या सभेमध्ये पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन मेचं अल्टीमेटम दिलं आहे. असं न झाल्यास आपण मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवू असं राज यांनी म्हटलं आहे. मात्र यामुळे राज्यामध्ये तणाव निर्माण होत असाताना माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर टीका करतानाच थेट त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच राज यांना आवर घालण्याची विनंती केली आहे. ते सोमवारी साताऱ्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी लक्ष्मण माने म्हणाले, “राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” असं आवाहन माने यांनी केलं आहे. त्याचबरोबर, “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर (राज ठाकरेंवर) गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे,” असं इशाराही लक्ष्मण मानेंनी दिला आहे.

“राज्य सरकारला भोंग्यांबद्दल अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय आहे?”, अशा खोचक शब्दांमध्ये लक्ष्मण मानेंनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. “ज्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे त्यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी सर्वसामान्यांना फसवण्याचा धंदा बंद करावा. कारण हिंदू राष्ट्रासाठी गळा काढणारे मूठभर लोक आहेत. अस्पृश्य, भटके, अल्पसंख्यांक, ख्रिश्चन, यहुदी, लिंगायत, जैन या जातीच्या लोकांना हिंदू राष्ट्र हवे आहे का?” असा सवाल देखाल माने यांनी उपस्थित केला आहे.

“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींचा अभ्यास करुन समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केलं. त्यावर आक्रम करुन भाजपाने देशात आणि राज्यामध्ये धुडगूस घातलाय,” असा टोला माने यांनी लगावला. राज ठाकरेंनी केलेली मागणी आणि भाजपाकडून होत असणाऱ्या संविधानावरील आक्रमणाचा निषेध करत असल्याचं सांगत, “राज ठाकरेंनी केवळ ठाकरे घरण्यात जन्म घेतलाय. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीमधील एक मोठे नेते होते. त्यांच्या विचारांचा आदर्श वर वारसा राज ठाकरेनी घ्यावा,” असंही माने म्हणालेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये