शिक्षण

दिव्यांग मुलांची समूहनृत्य स्पर्धेत मनमोहक अदाकारी : रमेश शहा

१७ शाळांमधून २५० विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : विशेष विद्यार्थ्यांकडून कार्यक्रम बसवून घेण्याचे काम फार जिकिरीचे असते. मात्र, शिक्षकांनी मेहनत घेऊन हे आव्हान लीलया पेलले आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच समूहनृत्याचा कार्यक्रम सुरेख झाला. विशेष मुलांची जिद्द आणि शिक्षक व पालकांची मेहनत यामध्ये मोलाची आहे,” असे मत लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४ डी-२ मधील सहकारी क्लब वतीने मतिमंद गट समूहनृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेत १७ शाळेतून एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळा व कार्यशाळा अशा दोन गटासाठी स्पर्धा होत्या.

स्पर्धेत कार्यशाळा गटात ‘सेवासदन दिलासा एरंडवणे’ गटाने प्रथम, ‘ओम साई ओम’ गटाने व्दितीय, तर माधवी ओगले (व्यावसायिक विभाग) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस साई संस्कार निगडी व नव क्षितिज कार्यशाळा यांनी मिळवले. शाळा गटात कामायनी निगडी शाळेने प्रथम, सेवासदन दिलासा लक्ष्मीरोडने द्वितीय, तर साई संस्कार निगडीने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ बक्षीस सेवाधाम व छत्रपती प्रतिष्ठानचे निवासी विद्यालय यांनी मिळवला.

विशेष मुलांचे कलागुण दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देण्यासह त्यांच्यातील आत्मविश्वास, सांघिक भावना, व्यक्तिमत्व विकास साध्य करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरत अाहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून ही विशेष मुले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकली आहेत, याकडेही सीमा दाबके यांनी लक्ष वेधले.

रमेश शहा म्हणाले, हा कार्यक्रम बघताना भारावून गेलो. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षक वृंद व संस्था चालकांची मेहनत कौतुकास्पद आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये