मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात उल्लेख केल्याने फडणवीस नाराज, म्हणाले…

अकोला | Devendra Fadnavis On Uddhav Thackeray – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे, आत्ताच नगरसेवक?” असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. यामध्ये आज (7 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
देवेद्र फडणवीसांनी अकोला येथे जिल्हा आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “उद्धव ठाकरेंसारख्या नेत्यानं एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करून टिपण्णी करणं अतिशय खालच्या दर्जाचं आहे. उद्धव ठाकरेंनी आपले शब्द परत घेतले पाहिजेत. एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं पटत नाही, पण काही पथ्य पाळली पाहिजेत”, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यात प्रत्युत्तर दिलं होते. त्यांनी म्हटलं की, “नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का?,” असं शिंदे यांनी म्हटलं आहे.