कृषीमंत्री सत्तारांकडून संसदरत्न सुप्रिया सुळेंना माध्यमांसमोर शिवीगाळ; म्हणाले…

औरंगाबाद | Abdul Sattar On Supriya Sule – राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आता देखील ते चर्चेत आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिल्याचं दिसून आलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सत्तारांच्या विधानासंदर्भात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना अब्दुल सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर शिवीगाळ केली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं वादग्रस्त विधान अब्दुल सत्तारांनी केलं आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्या नावानं असलेल्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रिया सुळेंबद्दल आणि पर्यायानं सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधानं सुरूच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तुवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत,” असं सदानंद सुळे यांच्या नावानं असलेल्या अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आलं आहे. मात्र, हे अकाऊंट व्हेरिफाइड नाही.