पुढील 48 तासांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

मुंबई | Maharashtra Rain Updates – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. काल (मंगळवार) हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
तसंच आता पुढील 48 तासांत महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अशी सूचना प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिल्या आहेत.