‘घमंडिया आघाडी’ला सनातन संपवण्याची इच्छा; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

भोपाळ | PM Narendra Modi – घमंडिया आघाडीला सनातन संपुष्टात आणायची इच्छा आहे. गांधीजींचे अखेरचे शब्द हे राम..असे होते, ते आयुष्यभर सनातनच्या बाजूने होते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी गुरुवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सागर येथील बीना रिफायनरी येथे ५० हजार कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्लांटची पायाभरणी केली. तसेच रिफायनरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकलखाटी गावात सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) टीका केली.
बुंदेलखंडमध्ये काँग्रेसने (Congress) जनतेला वीज, पाणी, रस्ते या सुविधांसाठी तळमळत ठेवले होते, असेही मोदी म्हणाले. मोदींनी १८०० कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये नर्मदापुरमचे ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा उत्पादन क्षेत्र, आयटी पार्क-३ आणि ४ इंदूर, मेगा इंडस्ट्रियल पार्क रतलाम, ६ इंडस्ट्रियल पार्क (नर्मदापुरम, गुना, शाजापूर, मौगंज, आगर-माळवा आणि मकसी) यांचा समावेश आहे.
सहा महिन्यांतील पंतप्रधानांचा हा मध्य प्रदेशचा सहावा दौरा आहे. १२ ऑगस्ट रोजी त्यांनी सागर येथे संत रविदास मंदिराची पायाभरणी केली होती.
भारताला हजारो वर्षांपासून एकत्र ठेवणारी सनातन संस्कृती काही लोकांना मोडायची आहे. त्यांच्याबाबत देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक सनातनी सावध राहायला हवे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान