पुणेफिचरसक्सेस स्टोरी

आपल्या आवडी कोणत्याही परिस्थितीत जपल्याच पाहिजेत; संदीपची सक्सेस स्टोरी

पुणे – success story | इच्छा तिथे मार्ग म्हणतात, असंच काहीसं संदीप वाघमारे या तरुणाने करून दाखवलं आहे. शिकण्याची हौस होती पण साधनं नव्हती; तरीही कसलीही तक्रार न करता संदीपने त्याच्या आवडत्या क्षेत्रात आपले पाय भक्कम केले आहेत.

संदीप सध्या ग्राफिक डिझाइनर आहे. तो लोकांच्या ऑनलाइन ऑर्डर स्वीकारून त्यांना ग्राफिक्स, लग्नपत्रिका, व्हिडीओ तयार करून देत असतो. अनेक लोकांनी मंथली आणि वार्षिक पॅकेजसाठी संदीपकडे ऑर्डर दिलेल्या असतात. संदीपला ग्राफिकच्या क्षेत्रात पूर्ण कमांड मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्याचा इथपर्यंतचा प्रवास खूपच कठीण आणि प्रेरणादायी आहे.

संदीप मूळचा जालना जिल्ह्यातला आहे. नोकरीसाठी गेल्या ४-५ वर्षापासून पुण्यात स्थायिक झाला आहे. सध्या तो चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये नोकरी करतो. संदीप शाळेत असल्यापासून कायम आपल्या मोबाइलमध्ये फोटो एडिट करायचा. वेगवेगळे apps डाऊनलोड करून त्यात वेगवेगळे फोटो तो एडिट करायला शिकला. पिक्सआर्ट, फोटोशॉप, फोटो एडिटर असे नवनवीन apps तो शिकत राहिला. त्याने बनवलेले ग्राफिक्स लोकांना आवडायला लागले आणि लोक त्याच्याकडे ऑर्डर पाठवायला लागले.

सुरुवातीला त्याच्याकडे कॉम्प्युटर नव्हता. त्यामुळं एकेका फोटोसाठी बराच वेळ जायचा. दोन वर्षांपूर्वी त्याने कॉम्प्युटर घेतला आणि वेगवेगळे सॉफ्टवेअरसुद्धा घेतले, पण सॉफ्टवेअर शिकण्याचे कोर्सेस तो करू शकत नसल्यानं स्वतःच यूट्यूबवर बघून तो ते सॉफ्टवेअर वापरायला शिकला. आता तो कोरल ड्रॉ, एडोबे प्रो, फिल्मोरा सारखे अतिशय प्रचलित सॉफ्टवेअर अगदी सहज वापरून त्यावर व्हिडीओ, ग्राफिक्स, लग्नपत्रिका, पॅम्पलेट, बर्थडे कार्ड तयार करतो. इंस्टाग्रामवर ‘संदीप ग्राफिक्स आर्ट ऑफिशियल १०१’ नावाच्या त्याच्या अकाऊंटवर तो कायम त्याने तयार केलेल्या डिझाइन पोस्ट करतो. ते पाहून अनेक लोक त्याला ऑर्डर देतात.

हे सगळं करीत संदीप नोकरीही करतो. त्यानं स्वतःकडे कमी साधने असताना आणि कोणीही शिकवायला नसताना ग्राफिक्सच्या क्षेत्रात मिळवलेलं यश प्रेरणादायी आहे. ‘स्वतः काहीतरी करता येतं तेव्हा आपण कधीही अडचणीत सापडत नाही. आपल्यासोबत आपलं कौशल्य असतं. आपण कोणत्या तरी क्षेत्रात कमांड मिळवलेली पाहिजेच. ती मिळवण्यासाठी कष्ट, संयम आणि चिकाटी महत्त्वाची आहे,’ असं संदीप सांगतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये