“सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे…”, गुलाबराव पाटलांची टीका
धानोरा | Gulabrao Patil On Sushama Andhare – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर काय टीका केली आहे याच्या क्लिप एकदा ऐका, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. ते चोपडा तालुक्यातील धानोरा येथे 16 कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात आज (1 नोव्हेंबर) सुषमा अंधारे यांची सभा होत आहे. याबद्दल गुलाबराव पाटलांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सुषमा अंधारे या इकडे येऊन तीन महिने झालेलं बाळ आहे. या पक्षामध्ये येऊन त्यांना तीन महिन्यांचाच काळ झाला आहे. त्यांचं बोलणं सगळेजण ऐकत आहेत. त्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय बोलल्या आहेत त्या क्लिपा एकदा ऐकवल्या पाहिजेत. या बाईनं हिंदू देवतांवर भयानक टीका केली आहे. त्याही क्लिपा दाखवल्या तर बरं होईल”, असं पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “सुषमा अंधारे यांनी आमच्यावर टीका जरूर करावी. तो त्यांच्या पक्षानं त्यांना दिलेला अधिकार आहे. मात्र, हिंदू देवतांवर या बाईनं किती भयानक टीका केली आहे, हिंदूंबाबत किती भयानक भाषणं केली आहेत, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर त्या काय काय बोलल्या आहेत, हिंदू धर्मावर काय बोलल्या आहेत याच्याही क्लिप्स दाखवाव्यात. अन्यथा, आम्ही हे सहन करणार नाही,” असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.