देश - विदेश

‘…ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही’; राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही अशी टीका केली होती. आता या टीकेवर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी या आरोपांवर उत्तर देताना काही दिवसांपूर्वीच मी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २५ मिनिटं भाषण केल्याचा दाखला पवारांनी दिला आहे.

शरद पवारांना राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता यावर उत्तर देताना ते म्हणाले, “शिवाजी महाराजांचं नाव मी घेत नाही असा उल्लेख केला. याबद्दल मी सांगू शकतो की दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीमध्ये होतो. माझं भाषण मागवलं तर शिवाजी महाराजांचं योगदान यावर २५ मिनिटांचं भाषण होतं.”

फुले, आंबेडकर शाहुंचा उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे. या राज्यामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्र सविस्तरपणे कोणी लिहिलं असेल तर फुलेंनी लिहिलं आहे. महाराजांचा कसा आदर्श घेऊन कशाप्रकारे करावा हे या तिघांनी मांडलं आहे, असं पवार म्हणाले आहेत. तसंच पुढे बोलताना शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर आपण आक्षेप घेतल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व घडवण्यामध्ये माँ साहेब जिजाऊंचा वाटा होता. मात्र पुरंदरेंनी तसं लिखाण केलं नाही. या लिखाणाला मी उघडपणे विरोध केला त्याचा मला अभिमान आहे. त्यांनीही कधी यासंदर्भात खुलासा केला नाही, असंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली़ त्यामुळे छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज यांनी आपल्या भाषणात केलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये