ताज्या बातम्यारणधुमाळी

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल कोश्यारी देणार पदाचा राजीनामा?

नवी दिल्ली | Governor Bhagat Singh Koshyari – गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. तसंच आता भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होणार असल्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचंही म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा अनेक पक्षांनी निषेध केला होता. यामध्ये शिंदे गटानंही नाराजी व्यक्त केली होती. तसंच छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

दरम्यान, औरंगाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र बोस, कोणाला महात्मा गांधी तर कोणाला पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचे आवडते हिरो कोण आहेत. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातच ते सापडतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय. डाॅ. आंबेडकरांपासून ते डाॅ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील, असं कोश्यारी यांनी म्हटलं होतं.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये