सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या झाली कमी

पिंपरी : सण-उत्सव-जयंती-पुण्यतिथीनिमित्त शहरात पूर्वी रक्तदान शिबिर घेण्याचे फॅड होते. मात्र, यावर्षी उन्हाची तीव्रता आणि महाविद्यालयांना सुट्यांमुळे शिबिरांची संख्या कमी झाली आहे.
परिणामी रक्तसंकलन घटल्याने मे महिन्यात ए, एबी पॉझिटिव्ह आणि सर्व निगेटिव्ह रक्तटंचाईची टांगती तलवार आहे. कर्तव्यभावनेतून दात्यांनी सोयीनुसार रक्तदानासाठी पुढे यावे, अशी विनंती रक्तपेढी चालक करू लागले आहेत.
वर्क फ्रॉम’चाही फटका?
’दोन वर्षांपासून शहरात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक आयटी कंपन्यांचे कर्मचारी ’वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे बंद झाली आहेत. रक्तदान शिबिरे बंद झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी पुढे यावे, असेही आवाहन रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे. अशीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात बहुतेक रक्तपेढ्यांची आहे.
शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. उन्हामुळे रक्तदान शिबिरांमध्ये खंड पडला आहे. उन्हाचा त्रास होत असल्यामुळे रक्तदात्यांपैकी १०० पैकी १० ते १५ जणच रक्तदान करीत आहेत. रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्याने रुग्णालयांना त्यांना बाहेरून रक्ताची सुविधा करण्यास सांगण्यात येत आहे.
नातलगांची धावपळ
शहरातील रुग्णालयांमध्ये यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपण वाढत असून, त्यासाठी एका रुग्णासाठी २० पिशव्यांची गरज भासत आहे. तसेच प्रसूतीकाळात जर रक्ताची अडचण निर्माण झाली, तर कुठे जायचे हा प्रश्न नातलगांना भेडसावत आहे. दुर्मीळ रक्तगटासाठी तर नातलगांना धावपळ करावी लागते. सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई आहे. रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे नातेवाईक वाद घालताहेत. प्रत्येक रक्तपेढीचे रक्तसंकलन व वितरण हे वेगवेगळे असले तरी उन्हाळ्यात संकलन नेहमीपेक्षा ३० ते ५० टक्क्यांनी घटते, हे आकडेवारीवरून स्पष्ट
होत आहे.