सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांची निवृत्ती कोणाच्या पथ्यावर?

नवी दिल्ली : (Chief Justice N. V. Ramana To Retire) एकनाथ शिदेंनी 40 आमदारांसह बंडखोरी केली अन् शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची अन् धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार यासाठी संघर्ष सुरु झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर न्यायालयात आतापर्यंत चार सुनावण्या पार पडल्या आहेत. मात्र यातून आद्याप कोणतेही निष्कर्ष समोर आले नाहीत. याचसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. काहीतरी निकाल समोर येईल असे वाटत असताना, आता पुन्हा सुनावणी 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यातच आता सरन्यायाधीश एन.व्ही. रमना हे 27 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांनी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे वाद रेंगाळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, सध्या सुनावणी होत असलेल्या शिंदे-ठाकरे याचिकांवर याचा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रमना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे-शिंदे गटांच्या पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे-ठाकरे गटाची पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. एकूणच न्यायालयात सध्या ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. तर नव्या सरन्यायाधीशांची एंट्री झाल्यास ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, असे मत तज्ञांना व्यक्त केलं आहे.