“महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या…” शिंदे-फडणवीस सरकारवर रोहित पवारांची खोचक टीका

मुंबई | राज्यातील प्रकल्प, उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याने महाविकास आघाडी सरकारने शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच हल्ला चढवला आहे. “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारा रोजगार गेला, तसंच, महाराष्ट्राचंही अतोनात आर्थिक नुकसान झालं”, असा दावा महाविकास आघाडीकडून सातत्याने करण्यात येतोय. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही तमिळनाडूत गेलेल्या एका उद्योगाबाबत ट्वीट करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
नाइकी, आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन ही कंपनी भारतात तमिळनाडूमध्ये 2300 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. “2300 कोटी गुंतवणुकीचा आणि 20 हजार युवांना रोजगार देणारा पो चेन कंपनीचा प्रकल्प खेचून आणणल्याबाद्दल तमिळनाडू सरकारचे अभिनंदन,” असं म्हणत रोहित पवारांनी महाराष्ट्र सराकरावर खोचक टीका केली आहे. “महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या दिसत नसल्याने तमिळनाडू सरकारचं अभिनंदन करताना त्यांचा हेवा आणि ईर्ष्याही वाटतेय आणि आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःखंही होतंय”, असं रोहित पवारांनी ट्वीट केलं आहे.