Pune News: विद्यापीठातील जेवणात झुरळे; कुलसचिवांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला

पुणे | Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या आणि झुरळे सापडल्याच्या प्रकारावरून आता मोठे रणकंदन माजले आहे. याला जबाबदार असणाऱ्या कुलसचिवांनी त्वरित राजीनामा द्यावा, यासाठी शासनावर दबाव वाढत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून येथील निकृष्ट जेवण आणि विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांबाबतचा आवाज उठवला जात होता. अनेक महिन्यांपासून विद्यापीठाचे वादग्रस्त कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याकडे मागणी करत येथे आहार समिती नेमावी आणि कॅन्टीनच्या जेवणाच्या दर्जाची नियमित तपासणी व्हावी, याबाबतची मागणी केली जात होती. कॅन्टीनची स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा याबाबत लक्ष घालण्याची विनंती देखील अनेक संघटनांनी केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
बुधवारी बाळासाहेब जानराव, अॅड. मंदार जोशी, परशुराम वाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र या कुलसचिवाचा राजीनाम्याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा पाहता जगभरातील विद्यार्थी येतात. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दर्जेदार अन्न उपलब्ध नाही, हीच दुर्दैवी बाब आहे. अशी प्रतिक्रिया वकील जोशी यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याकडे अनेकदा मागणी करून देखील हा दर्जा सुधारला जात नाही. स्वच्छता नाही. तसेच निर्देशांचे काटेकोर पालन केले जात नाही. विद्यार्थी आणि कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून आम्ही अनेक मागण्या केल्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता जेवणामध्ये आळ्या आणि झुरळे आढळून आले आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब पवार यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा शासनाने पवार यांना तातडीने निलंबित करावे, अन्यथा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शैलेंद्र निकाळजे, अशोक कांबळे, गणेश गायकवाड, सुशील सर्वगोड, डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.