मुंबईराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

राष्ट्रीय पातळीवर लोणावळा शहर अव्वल

स्वच्छता लीग २०२२

लोणावळा : देशातील विविध पर्यटन स्थळांसाठी राबविण्यात आलेल्या स्वच्छता लीग २०२२ या अभियानात लोणावळा नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहराने आपला डंका वाजवला असून ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या यशामुळे लोणावळा शहराच्या नावाला पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात झळाळी मिळाली आहे.

दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी पर्यटन स्थळांसाठी इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन केले गेले होते. या लीगमध्ये देशभरातील ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील एकूण १८५० शहर सहभागी झाली होती. या लीगसाठी कॅप्टन म्हणून काम करीत असलेले लोणावळा नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तलाव ते राजमाची उद्यान आणि सहारा पूल ते भुशी धरण या दोन ठिकाणी स्वच्छता अभियानासोबतच पथ नाट्य, प्लोगअथोन हे आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लोणावळा शहराच्या ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या अभिनेत्री आयेशा झुल्का, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्व शाळा, सामाजिक संस्था व नागरिक हे मोठ्या प्रमाणाने सहभागी झाले होते.

दिल्ली येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या आय. ए. एस. रूपा मिश्रा, उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव निकुंज श्रीवास्तव व अमृत अभिजात यांच्या हस्ते लोणावळा नगर परिषदेला गौरविण्यात आले. लोणावळा नगर परिषदेच्या नगर अभियंता वैशाली मठपती, नगर परिषद अभियंता यशवंत मुंडे, खरेदी पर्यवेक्षक दत्तात्रय सुतार, सहायक ग्रंथपाल विजय लोणकर आणि शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी ह पुरस्कार स्वीकारला. या लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता शनिवारी १ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या निकालाची उत्सुकता शहरवासीयांना लागून राहिली असून त्या मुख्य स्पर्धेत देखील लोणावळा शहराला असेच नेत्रदीपक यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये