शिव ठाकरे आकांक्षा पुरीला करतोय डेट? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा; म्हणाली, “तो खूप प्रेमळ अन्…”

मुंबई | Akanksha Puri – ‘बिग बाॅस 16’मुळे शिव ठाकरे (Shiv Thakare) चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसंच शिव नेहमीच त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत येत असतो. त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापनंतर त्याचं नाव निमृत कौर अहुवालियासोबत जोडलं गेलं होतं. अशातच आता शिवचं नाव प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत (Akanksha Puri) जोडलं जात आहे. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. याबाबत आता स्वत: आकांक्षा पुरीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
अनेक कार्यक्रमांमध्ये शिव आणि आकांक्षाला एकत्र स्पाॅट केलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान आता आकांक्षानं शिवसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तिनं नुकतीच इंडियन फोरम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं याबाबत भाष्य केलं आहे.
“शिवसोबतच्या डेटिंगच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. शिव ठाकरे हा एक चांगला मुलगा असून तो खूप प्रेमळ आहे. तो स्वीटहार्ट आहे. पण माझ्या नशिबात असे चांगले लोक नाहीत”, असं म्हणत आकांक्षानं शिवसोबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, आकांक्षा पुरी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं आत्तापर्यंच हिंदी, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तसंच आकांक्षा गायक मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये सहभागी झाली होती. या स्वयंवरात मिका सिंगनं आकांक्षाची वधू म्हणून निवड केली होती. पण त्यांनी काही कारणांमुळे लग्न केलं नाही. त्यावेळी आकांक्षा चांगलीच चर्चेत आली होती.