असे किरीट डोक्यावर…?

दुष्कृत्यांचा किरीट सर्वच पक्षांतील काही मंडळींनी कौतुकाने आणि लज्जाशून्य अवस्थेत मिरवला आहे. मात्र आता वारंवार हेच घडू नये याची न्यायालयानेही गंभीर दखल घ्यायला पाहिजे. जाता जाता समाजमाध्यम आणि माध्यमांमध्ये ज्या प्रकारे या क्लीप दाखवून आम्ही भांडाफोड केला असे सांगितले जाते, त्यांनीही क्लीप दाखवताना साधनशुचिता पाळणे गरजेचे आहे. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात केलेली टिप्पणी ही टिप्पणी नसून दिलेली समज आहे, याचाही विचार झाला पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार हे दुसऱ्या दिवसाच्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) प्रकरणावरून स्पष्ट झाले. किरीट सोमय्या प्रकरण हे ठरवून, टाइमिंग साधत काढलेले प्रकरण आहे. या प्रकरणामागे केवळ किरीट सोमय्या यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आहे, एवढेच नाही तर त्याचबरोबर किरीट सोमय्या यांचा भारतीय जनता पक्ष, त्यांना पाठिंबा देणारा एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा हेतू आहे.
याबरोबरच बंगलोर येथे सुरू असणारी यूपीएची बैठक आणि दिल्लीतील एनडीएची बैठक या सगळ्यांचा संदर्भ मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या किरीट सोमय्या सिडी प्रकरणाला आहे. या प्रकरणाची उकल किंवा त्यातील कंगोरे स्पष्ट करीत असताना आम्ही हे नक्की करतो की, किरीट सोमय्याच नव्हे तर अशाप्रकारची कृत्यं करणारा, महिलांच्या सन्मानावर आघात करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या समर्थनाचा आमचा मुद्दा नाही, तर त्यांचा केवळ निषेध आणि तीव्र शब्दांत निषेधच केला जाईल. हे प्रकरण आता चौकशीसाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतल्या खात्याकडे गेले आहे. केवळ चौकशी करतो असे नाही तर ती कालबद्ध रीतीने चौकशी करावी आणि त्याचा अहवाल जाहीर करावा, अशीच मागणी असेल.
राजकारणामध्ये थोडे वलय, सत्ता, प्रतिष्ठा प्राप्त झाली की, आपण कसेही वागण्यास हरकत नाही. कायदा, समाज संस्कृतीच्या चौकटीत आपण येत नाही अशी मस्तवाल वर्तणूक आणि भाषा राजकीय नेत्यांच्या मुखातून टपाटपा पडू लागते. विविध तपास यंत्रणांचा धाक दाखवत आणि आपल्या तालावर स्वार्थासाठी नाचवत समाजातील अशी प्रवृत्ती समाजातल्याच महिला आणि सामान्य मंडळींवर राज्य करीत असतात. यांच्यासारखेच उदाहरण संजय राऊत यांचे द्यावे लागेल. पुन्हा एकदा अशा घृणास्पद कृत्याचे समर्थन किंवा त्यामध्ये तुलना करण्याचे काहीच कारण नाही. कारण राऊत अथवा सोमय्या ही प्रवृत्ती आहे आणि ती निषेधार्ह आहे, असेच सगळ्यांचे मत असले पाहिजे. संजय राऊत यांनी पाटकर नावाच्या महिलेला दिलेल्या शिव्या आणि नालस्ती जगजाहीर झाली होती. असे असतानाही आजही तेच संजय राऊत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची बाजू प्रसारमाध्यमांपुढे हिरीरीने मांडताना दिसतात. केलेल्या आणि जाहीर झालेल्या त्यांच्या कृत्याबद्दल लाज वाटल्याची पुसटशी रेषासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली नाही. हाच प्रकार किरीट सोमय्या यांच्याबाबतीत घडणार नाही हे सांगता येत नाही.
किरीट सोमय्या यांनीही आपली चौकशी करावी, अशी गृहमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. ही चौकशी दुसऱ्याने करण्याऐवजी ती ध्वनिचित्रफीत आपलीच आहे की नाही? असेल तर त्यावेळची परिस्थिती काय होती? हे प्रकरण नक्की काय आहे? याची माहिती सोमय्या यांनीच सार्वजनिक करावी. मी लायक आहे की नालायक हे त्रयस्थ व्यक्तीने कशाकरिता शोधून काढायचे? आणि ते शोधून काढल्यावर न्यायालयीन खेळ करीत बसायचे? यात वेळेचा अपव्य नको, परंतु एकदा का खटले न्यायालयात गेले की, ही मंडळी उजळ माथ्याने फिरण्यास मोकळी होतात, हा इतिहास आहे. इतिहासात यापूर्वी अशाप्रकारची बरीच प्रकरणे झाली आहेत आणि याबाबत आता फार गंभीर वाटावे असे दुर्दैवाने समाजालाही वाटत नाही. अर्थात समाज आपल्या स्वभाव आणि गुणधर्माचेच प्रतिनिधी निवडत असतो, असेही लोकशाहीबाबत म्हटले जाते. अर्थात समाजात मुकी बिचारी कुणीही हाका अशा परिस्थितीत गांजलेली मंडळीच जास्त असतात. त्यामुळे समाजाला भ्रष्ट ठरवण्याचे कारण नाही, परंतु अशा नीच प्रवृत्तीचा कडाडून विरोध करण्याची ताकदही त्यांच्यात नसल्याने राजकीय भ्रष्ट आचरणाची ही परंपरा कायम राहाते हे मान्य करायला हवे.
अशा दुष्कृत्यांचा किरीट सर्वच पक्षांतील मंडळींनी कौतुकाने आणि लज्जाशून्य अवस्थेत मिरवला आहे. मात्र आता वारंवार हेच घडू नये याची न्यायालयानेही गंभीर दखल घ्यायला पाहिजे. जाता जाता समाजमाध्यम आणि माध्यमांमध्ये या क्लीप दाखवून आम्ही भांडाफोड केला असे सांगितले जाते, त्यांनीही क्लीप दाखवताना साधनशुचिता पाळणे गरजेचे आहे. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात केलेली टिप्पणी ही टिप्पणी नसून दिलेली समज आहे, याचाही विचार झाला पाहिजे.