किरीट सोमय्यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेरीस आणण्याचा डाव असेल तर…”

मुंबई | Kishori Pednekar On Kirit Somaiya – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची दादर पोलिसांकडून एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही त्यांच्यावर या घोट्याळ्याप्रकरणी आरोप केले आहेत. या आरोपानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला, ते भाजपच्या वाॅशिंग मशीनमध्ये गेले. हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असं पेडणेकर म्हणाल्या. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
किरीट सोमय्या दरवेळी प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणाशी संबंध असलेल्या विभागानंही यामध्ये माझा संबंध नसल्याचं लिहून दिलेलं आहे. पण तरीदेखील मी सीईओ, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, असं सोमय्या म्हणत आहेत. दबावतंत्राने आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे. सोमय्या हे एकाच गोष्टीला घेऊन वारंवार आरोप करत आहेत. विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला गेला ते भाजपच्या वाॅशिंग मशीनमध्ये गेले. हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, मी मागील कित्येक वर्षांपासून वरळी विधानसभेतच राहते. माझ्या आयुष्याचं पुस्तक उघडं आहे. माझं सासर आणि माहेर हे वरळी विधानसभा मतदरसंघातच आहे. मी गोमातानगरमध्ये 2017 साली फाॅर्म भरला होता. तेव्हा मी केअर ऑफ म्हणून हा फाॅर्म भरलेला होता. पण कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
किरीट सोमय्यांनी केलेला आरोप
“भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता SRA मध्ये 6 गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की या सदनिकांचा ताबा घ्यावा”, अशी मागणी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली होती.