कोल्हापूर शहर गुडघाभर खड्ड्यातच!

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर शहर गुडघाभर खड्डेमय असताना शहराला कोकणाला जोडणारा रस्ताही खचला आहे. त्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, तसेच जोतिबा आणि पर्यटन स्थळांवर येणाऱ्या देशी-परदेशी पर्यटकांना काय संदेश देत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापुरात दररोज सरासरी ७० हजार पर्यटक येतात. सुटीच्या काळात ही संख्या दोन लाखांवर जाते. नवरात्रामध्ये अंबाबाई मंदिरात गर्दीने विक्रम मोडला.
त्यामुळे या खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूरचे पर्यटन नव्या पालकमंत्र्यांना करायचे आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो.कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर- रत्नागिरी मार्ग पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. बिद्रीपासून ते गारगोटीपर्यंत प्रत्येक १०० ते २०० मीटरवर २५ ते ३० फूट रस्ता उखडून गेला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था वस्तीवरील पाणंदीपेक्षाही भिकार झाली आहे.
मागील काही दिवसांपासून सर्वच स्तरांतून शहरातील रस्त्यांच्या दर्जावरून शिमगा सुरु झाल्यानंतर गेंड्याच्या कातडीला जाग आली. त्यानंतर कोल्हापूर शहरात पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले. परंतु, त्या पॅचवर्कचा दर्जा पाहता खड्ड्यांपेक्षा हे पॅचवर्क आवरा म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल काहीच वाटत नाही का, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते.
दरम्यान, डांबरांचा केवळ नैवेद्य दाखवल्याप्रमाणे दगडी खडी उखडण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पॅचवर्क करून अवघे पंधरा दिवसही झालेले नाहीत. शहरातील पॅचवर्कची हीच अवस्था आहे. त्यामुळे खड्ड्े भरून कधी निघणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.