मोठी दुर्घटना! शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळले, 9 जणांचा मृत्यू

शिमला | Shimla Landslide – हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) मोठी दुर्घटना घडली आहे. शिमल्यामध्ये (Shimla) भुस्खलन झाल्यामुळे शिव मंदिर कोसळले. हे मंदिर कोसळून यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या शिवमंदिर दरडीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज (14 ऑगस्ट) सोमवार असल्यामुळे शिव मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशातच शिमल्यात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. शिमल्यातील समरहिल येथील बाळूगंडच्या शिव बावडी मंदिराजवळ ही दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दरडीखाली नऊ जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच सध्या येथे बचावकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. तसंच या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून हे नऊ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली.