आयुष्यातील ‘रिकाम्या जागा’…

अश्विनी धायगुडे-कोळेकर
आपल्या आयुष्यातील ‘रिकाम्या जागा’ या कायमच ‘योग्य व्यक्ती’ने भरल्या जाव्यात… अन्यथा जागा भरलेल्या त्या चुकीच्या व्यक्तीपेक्षा आपलं ‘रिकामपण’च आपल्याला बरं वाटायला लागतं.
या ओळी वाचल्या आणि सहजच एक विचार मनात डोकावून गेला. आपल्या साध्यासोप्या नि सरळ आयुष्याची तितकीच साधी, सरळ नि सोपी व्याख्या म्हणजे या चार ओळी.
प्रत्येकाच्या आयुष्यात जवळच्या माणसांबाबतच्या काही अपेक्षा असतात. कोणाला प्रचंड बोलकी व्यक्ती आपाल्या आयुष्यात हवी असते, तर कोणाला शांत, मितभाषी. कोणाला गोरापान आरस्पानी रंग असणारी व्यक्ती हवी असते, तर कोणाला डार्क कॉम्प्लेक्शन असणारी. कोणाला उत्तम वाचक असणारी, तर कोणाला केवळ प्रेक्षक असणारी. प्रत्येकाचा चॉइस वेगळा असतो. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, वैचारिक बैठकीप्रमाणे ही अपेक्षा असते. हिला आपण व्यक्तिसापेक्ष म्हणू शकतो. तर हे झाल वरवरचं… बाह्य रूपाबद्दलचं. पण आंतरिक सौंदर्य आणि ओढीचं काय?
कैकदा माणसं वरल्या रंगाला भुलतात आणि मग आयुष्यभराचं दुखणं वागवत बसतात. काय अपेक्षा होती नि पदरात काय पडलं असं सातत्याने वाटत राहतं आणि मग हे वाटणंच मनातील ‘अव्यक्त सल’ बनून राहते. मग माणूस वेगळे पर्याय जोखायचा प्रयत्न करतो. इथे यश मिळालं तर ठीक, मात्र पदरी पुन्हा निराशा पडली तर मात्र आयुष्याची वाताहत निश्चित.
या सगळ्यात जर एखाद्या ठिकाणी मायेचा ओलावा मिळाला तर मात्र माणसाच्या जगण्याला दिशा तर मिळतेच, पण त्याच्या जगण्याला अर्थदेखील मिळतो. इथे मात्र कदाचित वर नमूद केलेले बाह्यरूपाबाबतचे सगळे आडाखे, अपेक्षा यांचा दुरान्वयेही संबंध येत नाही. कारण इथे मनं जुळली जातात. भावनिक ओलावा, एकमेकांप्रतिची आत्मीयता, ओढ, एकमेकांबद्दलचे प्रेम, आदर याचा परिपाक म्हणजे अशी हळवी नाती. ही सांभाळणं तसं जिकिरीचं काम असतं. फुलपाखरांइतकंच आयुष्य येऊ शकतं यांच्याही नशिबी. त्यामुळे जिवापाड जपावं लागतं यांना. पण समजा नाहीच सांभाळली ही नाती तर…? तर आयुष्यातील महत्त्वाच्या रिकाम्या जागा चुकीच्या व्यक्तीने भरल्या जातात.
त्यामुळे असे हळवे कोपरे, हळव्या आठवणी, हळवी माणसं, हळवी कातरवेळ आणि सोबतीला कॉफी असेल तर आयुष्यातील रिकाम्या जागा कधीच चुकीच्या व्यक्तीने भरल्या जाणार नाहीत. मग हक्काने त्या व्यक्तीला सांगायचं, ‘माझी ओंजळ ‘आनंदा’ने भर…’