राज्यात ‘या’ तारखेला लागणार आचारसंहिता? शिवसेनेच्या नेत्याचे संकेत

राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल याची तारीख समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार १३ किंवा १४ तारखेला आचारसंहिता लागू शकते असं या नेत्यानं म्हटलं आहे.
कधी होणार निवडणूक जाहीर?
शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी आचारसंहितेच्या तारखेबाबत सुतोवाच केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. राज्यात महायुतीची परिस्थिती भक्कम असून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. १३ किंवा १४ तारखेला राज्यात आचारसंहिता लागू होईल,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली
दरम्यान, राज्य सरकारनं लाडकी बहिण योजनेची मुदतही वाढवली आहे. त्यानुसार आता १५ ऑक्टोबरपर्यंत पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. त्यामुळं आचारसंहितेबाबत अद्याप संभ्रमच असल्याची चर्चा आहे. कारण सरकारनं १५ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केल्यानं आचारसंहिता त्यानंतर लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.