ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

‘तिसरी आघाडी’ भाजपच्या फायद्याची! काँग्रेसच्या महाअधिवेशनातील ठरावात भूमिका

रायपूर : (Mallikarjun Kharge On Narendra Modi) भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पराभव करायचा असेल तर समविचारी पक्षांनी तातडीने एकत्र येण्याची गरज आहे. बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल. विरोधकांची तिसरी आघाडी मात्र भाजपच्या फायद्याची ठरेल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने रायपूरमधील महाअधिवेशनातील राजकीय प्रस्तावात घेतली आहे.

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधकांच्या महाआघाडीसाठी काँग्रेस पुढाकार घेत असल्याचे संकेत नागालँडच्या प्रचारसभेत तसेच, दिल्लीतील पक्षाच्या कार्यक्रमातील भाषणात दिले होते. हाच मुद्दा खरगे यांनी शनिवारी महाअधिवेशनातील भाषणातही अधोरेखित केला. २००४ ते १४ या वर्षांमध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली किमान समान कार्यक्रमाच्या आधारे काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार यशस्वीपणे चालवून दाखवले होते. ‘यूपीए’मध्ये समविचारी पक्षांचा समावेश होता, आता ही आघाडी आणखी सशक्त करण्याची गरज आहे. भाजप आणि संघाविरोधात लढण्याची इच्छा असलेल्या सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन संघर्ष करण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे खरगे म्हणाले. देश आत्ता अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, काँग्रेस पक्षच देशाला सक्षम आणि ठोस नेतृत्व देऊ शकतो, असेही खरगे म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसने एकट्याने लढण्याचे दिवस संपले असल्याची कबुली माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली होती. विरोधी पक्षांशी जुळवून घेऊन भाजपविरोधात लढण्यास काँग्रेस तयार आहे, पण जनतेला पर्यायी धोरण दिले पाहिजे, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले होते. ‘स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात, देशात कधीही पाहिली नसेल इतकी भीती आणि द्वेष गेल्या साडेआठ वर्षांत अनुभवला आहे. केंद्रातील भाजप सरकारने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या, तसेच आत्तापर्यंत सत्तेवर आलेल्या सरकारांनी जोपासलेल्या राष्ट्रीय विचारांना उद्ध्वस्त केले आहे. ब्रिटिश राजवटीला हातभार लावणाऱ्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. या विचारांना पाठिंबा देणाऱ्याकडे देशाची सत्ता आलेली आहे. गांधींचा वारसा नष्ट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे राजकीय प्रस्तावात नमूद करून काँग्रेसने विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

बिगरभाजप विरोधी पक्षांची महाआघाडी करण्याची भूमिका काँग्रेसने मांडली असली तरी, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, भारत राष्ट्र समिती, समाजवादी पक्ष अशा अनेक बिगरभाजप प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस आघाडीला विरोध केला आहे. गेल्या महिन्यामध्ये या पक्षांच्या नेत्यांची तिसरी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात हैदराबादमध्ये बैठकही झाली होती. भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल तसेच, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. शरद पवार यांनी काँग्रेसशिवाय विरोधकांची महाआघाडी होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले असले, तरी काँग्रेस व तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मेघालयच्या प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाअधिवेशनामध्ये शुक्रवारी अनेक नेत्यांनी मात्र विरोधकांची महाआघाडी करण्याच्या सूचनेला पाठिंबा दिला. पुढील सहा महिन्यांमध्ये काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटीसाठी गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे राष्ट्रीय प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. हाच मुद्दा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मांडला. निवडणूकपूर्व असो वा निवडणुकोत्तर असो, विरोधकांची एकजूट झाली पाहिजे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी आघाडी केली पाहिजे, तरच भाजपविरोधी मते एकत्र होतील, असे चव्हाण म्हणाले.

राज्यातील सत्तासंघर्षाचे पडसाद काँग्रेसच्या राजकीय प्रस्तावामध्ये उमटले आहेत. ‘यूपीए-२’च्या काळात पक्षांतर्गत बंदी कायद्यामध्ये दुरुस्ती करून हा कायदा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला गेला. पण, २०१४ नंतर मात्र भाजपने घाऊक बंडखोरी घडवून आणली, विधानसभेतील सदस्यांना ‘खरेदी’ केले, लोकनियुक्त सरकारे पाडली. घाऊक बंडखोरीचे गैरप्रकार थांबवण्यासाठी काँग्रेस कायद्यात दुरुस्ती करेल, असे प्रस्तावात नमूद केले आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते अशोक चव्हाण यांनी हाच मुद्दा भाषणात अधोरेखित केला. राजभवने राजकीय केंद्र बनली आहेत. राज्यपाल लोकनियुक्त सरकारांमध्ये हस्तक्षेप करत असून, त्यांना अधिक उत्तरदायी बनवण्याची वेळ आलेली आहे. पक्षांतर कायदा भाजपने पूर्ण बोथट करून टाकला आहे, अशी तीव्र टीका चव्हाण यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये