“मोदी सरकारच्या कृपेने आता मरणही महाग झालं आहे”

मुंबई | Sachin Sawant On Modi Government – राज्यात आता वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला चांगलाच फटका बसला आहे. बिगर ब्रँडेड पण लेबल लावून विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर बहुचर्चित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू होणार आहे. बिगर ब्रँडेड वस्तू विकताना त्यावर पाच टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. त्याच वेळी 5,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रुग्णालय खोल्यांसाठी जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवाही महागणार आहेत. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यात म्हणाले की, “मोदी सरकारच्या कृपेने आता मरणही महाग झालं आहे. मरणाच्या दारावर ही मोदी सरकार टॅक्स वसूल केल्याशिवाय वर जाऊ देणार नाही. भाजपाचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत किती व्यापक आहे हे लक्षात घ्या,” असं म्हणत सावंत यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, मागील महिन्यात जीएसटीचे करस्तर ठरवणाऱ्या जीएसटी परिषदेची मागील महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत जीएसटीतून वगळण्यात आलेल्या तसंच जीएसटी सवलत मिळणाऱ्या अनेक वस्तूंना जीएसटी कक्षेअंतर्गत आणण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी अनेक वस्तू व सेवांवर जीएसटी वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.