“…नाहीतर सोमवारी पंतप्रधानांनी माझी माफी मागावी”; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान

नवी दिल्ली (Manish Sisodia ED Case) : देशभरातील प्रादेशिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून ‘भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांवर कारवाया करते’ असा आरोप केला जात आहे. दरम्यान, कथित आर्थिक घोटाळ्यात ईडीच्या कचाट्यात असेलेल्या भाजप विरोधी पक्ष ‘आप’च्या दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.
आपचे नेते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ‘माझ्यावरील आरोप सिद्ध नाही झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माझी माफी मागावी’ असं आव्हान केलं आहे. मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह संबंधित २१ ठिकाणी १९ ऑगस्ट दिवशी ईडीने छापे टाकले होते. त्या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्लीत केजरीवाल सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणात (मद्यविक्री धोरणात) आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात सिसोदिया यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान केलं आहे. “सीबीआयने माझ्या घरावर छापे मारले. त्यांना काही सापडलं नाही. त्यांना तिजोऱ्यांमध्येही काही सापडलं नाही. आता भाजपा स्टिंग ऑप्रेशनच्या माध्यमातून मला लक्ष्य करत आहे. सीबीआय आणि ईडीने स्टिंग ऑप्रेशनचीही चौकशी करावी. जर आरोप सिध्द झाले तर, मला सोमवार पर्यंत अटक करावं आणि जर आरोप सिध्द नाही झाले तर सोमवारपर्यंत पंतप्रधानांनी खोटे स्टिंग ऑप्रेशन केल्यामुळे माझी माफी मागावी.” असं थेट आव्हान केलं आहे.